मुंबई : देशात नैर्ऋत्य मोसमी पावसाचा हंगाम संपल्याची घोषणा नुकतीच हवामान विभागाने केली. पुढील काही दिवसांत राज्यातून पाऊस माघारी फिरण्याचा अंदाज आहे. दरम्यान, ऑक्टोबरआरंभीच कोकणात उन्हाची तीव्रता वाढण्याची शक्यता आहे. शुक्रवारपासून पुढील तीन दिवस मुंबईसह संपूर्ण कोकण प्रदेशात उष्ण व दमट वातावरणाचा ‘यलो अलर्ट’चा इशारा हवामान विभागाने दिला आहे.
यंदा कोकणात पावसाचे प्रमाण असामान होते. उत्तर कोकणात सरासरीच्या आसपास पाऊस झाला असला तरीही दक्षिण कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यातील काही व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बहुतांश भागात पावसाचे प्रमाण कमीच होते. तसेच ऑगस्टपासून संपूर्ण कोकण प्रदेशात पावसाने ओढ दिल्याने येथील शेतकऱ्यांनाही विविध समस्यांना सामोरे जावे लागत आहे.
पावसात मोठा खंड निर्माण झाल्याने गेले अनेक दिवस बहुतांश भागांत कोरडे हवामान आहे. सप्टेंबरमध्ये कोकण प्रदेशात ३७४.१ मिमी पाऊस पडणे अपेक्षित असते. यंदा या प्रदेशात १९०.९ मिमी पावसाची नोंद झाली. त्यामुळे ४९ टक्के तूट निर्माण झाली आहे. सप्टेंबरअखेरीस काही भागांत उकाड्यात वाढ झाली आहे. पुढील काही दिवस उन्हाची तीव्रता आणखी वाढण्याचा अंदाज आहे.
शुक्रवारी पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यांसाठी उष्ण व दमट वातावरणाचा ‘यलो अलर्ट’ देण्यात आला आहे. शनिवारीही हीच स्थिती कायम राहील, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. शिवाय, रविवारी ठाणे, रायगड व रत्नागिरी, तर सोमवारी रायगड व रत्नागिरी जिल्ह्याला उष्ण व दमट वातावरणाचा ‘यलो अलर्ट’ हवामान विभागाने दिला आहे.
आरोग्यावरील परिणाम
उष्माघात, डोकेदुखी, त्वचेच्या समस्या, थकवा व पाण्याच्या कमतरतेमुळे त्रास वाढतात. तापमान खूप वाढल्यास शरीराचं तापमान नियंत्रित न राहता अचानक चक्कर, उलट्यांचा त्रास होतो. जास्त घाम येतो. शरीरात पाण्याचे प्रमाण कमी झाल्याने थकवा जाणवतो. दमट हवेमुळे घामोळे, खाज व लालसरपणा दिसून येतो.
