लोकसत्ता प्रतिनिधी

मुंबई : दहा वर्षांपूर्वी, २०१६ मध्ये कोपर्डी येथे एका अल्पवयीन मुलीवरील बलात्कार आणि खून प्रकरणातील दोषसिद्ध आरोपींना सुनावण्यात आलेली फाशीची शिक्षा कायम ठेवली जाणार की नाही याबाबतचा निर्णय मुंबई उच्च न्यायालयाने मंगळवारी राखून ठेवला. दोषींची फाशीची शिक्षा कायम ठेवण्यासाठीचे प्रकरण नियमानुसार उच्च न्यायालयात वर्ग झाले असून शिक्षेच्या निर्णयाला आरोपींनीही आव्हान दिले आहे.

न्यायमूर्ती भारती डांगरे आणि न्यायमूर्ती आशिष चव्हाण यांच्या खंडपीठाने अहिल्यानगर जिल्ह्यातील कोपर्डी गावाला प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केल्यानंतर प्रकरणाची सोमवारी अंतिम सुनावणी सुरू केली होती. घटनाक्रमाबाबतच्या परस्परविरोधी दाव्यांचे मूल्यांकन करण्यासाठी खंडपीठाने घटनास्थळाची रचना, दृश्यमानता आणि साक्षीदारांची त्यावेळची स्थिती यांची पाहणी केली होती. या प्रकरणी मंगळवारी झालेल्या सुनावणीच्या वेळी अंतिम युक्तिवाद पूर्ण झाल्यानंतर न्यायालयाने दोषींची फाशीची शिक्षा कायम ठेवण्याबाबतची याचिका आणि आरोपींचे शिक्षेविरोधातील अपील यावरील निकाल राखून ठेवला.

दहा वर्षांपूर्वी, १३ जुलै २०१६ रोजी एका १५ वर्षांच्या मुलीवर लैंगिक अत्याचार केल्यानंतर तिचा खून करण्यात आला होता. नोव्हेंबर २०१७ मध्ये, अहमदनगर सत्र न्यायालयाने जितेंद्र बाबूलाल शिंदे, संतोष गोरख भावल आणि नितीन गोपीनाथ भैलुमे या तीन आरोपींना त्यांच्यावरील आरोपांत दोषी ठरवून त्यांना फाशीची शिक्षा सुनावली होती. दरम्यान, प्रकरणातील मुख्य आरोपी शिंदे याने २०२३ मध्ये पुण्यातील येरवडा मध्यवर्ती कारागृहात आत्महत्या केल्यामुळे त्याच्याविरुद्धची फौजदारी कायदेशीर कार्यवाही संपुष्टात आली.

उर्वरित दोषींसाठी फाशीची शिक्षा कायम ठेवण्याची मागणी करताना, गुन्ह्याचे अत्यंत क्रूर स्वरूप आणि परिस्थितीजन्य पुराव्यांची अखंड साखळी पाहता त्यांना फाशीची शिक्षा देणेच योग्य ठरेल, असा युक्तिवाद राज्य सरकारतर्फे सुनावणीच्या वेळी करण्यात आला. शिंदे याने मृत मुलीवर लैंगिक अत्याचार आणि तिचा गळा आवळून खून केला असला, तरी भावल आणि भैलुमे यांनी गुन्ह्याचा कट रचण्यात आणि गुन्हा घडवून आणण्यात सक्रिय सहभाग घेतला होता हेही सरकारी वकिलांनी दोघांची फाशीची शिक्षा कायम ठेवण्याची मागणी मान्य करताना न्यायालयाला सांगितले.

घटनेच्या आधी ते घटनेपर्यंत म्हणजेच, १ ते १३ जुलै २०१६ या कालावधीत सह-आरोपींनी मृत मुलीचा पाठलाग करणे, तिला अडवणे आणि तिच्या प्रत्येक हालचालींवर पाळत ठेवली होती. यावरून त्यांचा संयुक्त गुन्हेगारी सहभाग सिद्ध करणाऱ्या घटनांची संपूर्ण साखळी स्पष्ट होते, असे सरकारी वकिलांनी न्यायालयाला सांगितले. मृत मुलीच्या वर्गमित्राची आणि आरोपींना घटनास्थळाजवळ एकत्र पाहणाऱ्या स्थानिक साक्षीदारांची साक्षी यांचा आधार घेऊन, दोन्ही आरोपींना फाशीची शिक्षाच झाली पाहिजे, असा दावा सरकारी पक्षाने केला. अल्पवयीन मुलीला करण्यात आलेल्या क्रूर जखमा आरोपींची अत्यंत विकृत मानसिकता दर्शवतात, असेही सरकारी वकिलांनी न्यायालयाला सांगितले. याउलट, दातांच्या ठशांचे विश्लेषण आणि डीएनए चाचणीसह केलेल्या न्यायवैद्यक चाचण्यांमधून भवाल आणि भैलुमे यांना वगळण्यात आले आहे, तसेच, त्यांची शिक्षा केवळ अप्रत्यक्ष दायित्वावर आधारित आहे, असा युक्तिवाद दोघांच्या वतीने करण्यात आला.