भीमा-कोरेगाव हिंसाचार प्रकरणात एल्गार परिषदेच्या २२ सदस्यांविरोधात राष्ट्रीय तपास यंत्रणेने आरोपपत्र दाखल केले आहे. राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) कोरेगाव-भीमा आणि एल्गार परिषद प्रकरणातील आरोपींनी कथितरीत्या भारतातील महत्त्वाच्या विद्यापीठांच्या विद्यार्थ्यांना महाराष्ट्र आणि देशातील दहशतवादी कारवाया घडवून आणण्यासाठी नेमलं होतं असा ठपका आरोपपत्रात ठेवला आहे. भीमा कोरेगाव हिंसाचाराशी संबंधित एल्गार परिषद प्रकरणाच्या आरोपपत्रामध्ये एनआयएने दिल्लीच्या जेएनयू तसेच टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस (टीआयएसएस) च्या विद्यार्थ्यांना दहशतवादी कारवाया घडवून आणण्यासाठी नेमलं होतं असे म्हटले आहे.
गेल्या चार वर्षांपासून भारतीय राजकारणाला हादरवून टाकणाऱ्या प्रकरणांच्या संदर्भात अटक केलेल्या १६ आरोपी आणि इतर सहा फरार व्यक्तीविरोधात दाखल करण्यात आलेल्या दुहेरी खटल्यांमध्ये एनआयएने दाखल केलेल्या आरोपपत्रात हा दावा केला आहे.




Maharashtra: In its draft charge sheet in Elgar Parishad case related to Bhima Koregaon violence, NIA says students of various universities including Delhi’s JNU as well as Tata Institute of Social Sciences (TISS) were recruited to carry out terror activities
— ANI (@ANI) August 23, 2021
दोन्ही प्रकरणांच्या प्रदीर्घ तपासानंतर, एनआयएच्या विशेष न्यायालयाचे विशेष न्यायाधीश डी.ई. कोथळीकर यांच्यासमोर गेल्या आठवड्यात मसुदा आरोपपत्र दाखल करण्यात आले. एनआयएच्या म्हणण्यानुसार, आरोपींनी दहशतवादी कारवायांसाठी दोन प्रतिष्ठित जवाहरलाल नेहरू विद्यापीठ (नवी दिल्ली) आणि टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्स (मुंबई) यासह विविध विद्यापीठांमधील विद्यार्थ्यांना दहशतवादी कारवाया घडवून आणण्यासाठी नेमलं होतं असा ठपका ठेवला आहे.
यासाठी, आरोपींनी केंद्र आणि महाराष्ट्र सरकारविरोधात युद्ध करण्याचा कट रचला होता. नेपाळ आणि मणिपूरमधून एम -४ (अत्याधुनिक शस्त्र) च्या ४,००,००० फेऱ्या आणि इतर शस्त्रास्त्रांच्या वार्षिक पुरवठ्यासाठी ८ कोटी रुपयांची नियोजन करण्याचे षडयंत्र रचले असे एनआयएने म्हटले आहे.
या प्रकरणामध्ये सुधीर पी. ढवळे, वेरनोन गोन्साल्विस, अरुण टी. परेरा, रोना जे. विल्सन आणि गौतम नवलखा, सुरेंद्र पी. गडलिंग, शोमा के. सेन, महेश एस. राऊत, पी. वरवरा राव, सुधा भारद्वाज, आनंद बी. तेलतुंबडे, हनी बाबू एम. थरायल, सागर गोरखा, रमेश गायचोर यांना अटक करण्यात आली आहे. तर दिवंगत स्टॅन स्वामी यांचा ५ जुलै रोजी मुंबईतील कोठडीत मृत्यू झाला.
पुण्यातील शनिवारवाडयाच्या प्रांगणात आयोजित करण्यात आलेल्या एल्गार परिषदेच्या आयोजनात नक्षलवादी संघटनांचा हात असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर पोलिसांनी सर्वांना अटक केली होती. या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या संशयितांकडून कागदपत्रे, लॅपटॉप, पत्रे जप्त करण्यात आली होती. बंदी घातलेल्या नक्षलवादी संघटनांच्या प्रमुखांशी ते संपर्कात असल्याचे पुरावे पोलिसांनी न्यायालयात सादर केले होते.