मुंबई : मध्य रेल्वेने छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) येथून धावणाऱ्या कोयना एक्स्प्रेस व होस्पेट एक्स्प्रेसच्या पारंपरिक डब्यांऐवजी आता आधुनिक एलएचबी (लिंक हॉफमन बुश) डबे जोडण्याचा निर्णय घेतला आहे. या दोन्ही रेल्वेगाड्या जानेवारी २०२७ पासून नव्या डब्यांसह धावतील. शिवाय, दोन्ही रेल्वेगाड्यांच्या डब्यांच्या रचनेतही कायमस्वरूपी बदल करण्यात येतील.
गाडी क्रमांक ११०२९ / ११०३० कोयना एक्स्प्रेस व गाडी क्रमांक १११३९ / १११४० होस्पेट एक्स्प्रेस या दोन्ही रेल्वेगाड्यांना प्रत्येकी १८ एलएचबी डबे जोडण्यात येतील. नव्या रचनेनुसार एका वातानुकूलित द्वितीय श्रेणीचे, तीन वातानुकूलित तृतीय श्रेणीचे, सहा शयनयान श्रेणीचे, सहा सामान्य द्वितीय श्रेणीचे, एक जनरेटर डबा व एक आसनव्यवस्था व सामानासह गार्डचा ब्रेक व्हॅन असे डब्यांचे स्वरूप असेल.
कोल्हापूरहून सुटणारी कोयना एक्स्प्रेस १० जानेवारी २०२७ पासून, तर सीएसएमटीहून सुटणारी कोयना एक्स्प्रेस १२ जानेवारीपासून एलएचबी डब्यांसह धावेल. सीएसएमटीहून सुटणारी होस्पेट एक्स्प्रेस १० जानेवारीपासून, तर होस्पेटहून सुटणारी गाडी ११ जानेवारीपासून नव्या डब्यांसह धावणार आहे.
एलएचबी डब्यांमुळे प्रवाशांना अधिक आरामदायी प्रवासाचा पर्याय उपलब्ध होणार आहे. तसेच डब्यांच्या रचनेतील बदलामुळे वातानुकूलित, शयनयान व सामान्य श्रेणीतील आसनांची उपलब्धता नव्या प्रमाणात निश्चित होणार आहे. प्रवाशांनी नव्या वेळापत्रकाची आणि थांब्यांची माहिती भारतीय रेल्वेच्या संकेतस्थळावर वा एनटीईएस ॲपवर तपासावी, असे आवाहन मध्य रेल्वेने केले आहे.
कमाल वेग हा एलएचबी प्रवासी डबा आधुनिक असून तो स्टेनलेस स्टीलपासून बनविण्यात आला आहे. या डब्यांमध्ये अँटी-क्लाइंबिंग उपकरणे व अग्निरोधक साहित्य यासारख्या अत्याधुनिक सुरक्षा सुविधा दिल्या जातात. जुन्या पद्धतीच्या आयसीएफ डब्यांच्या तुलनेत या डब्यांचा सध्याचा वेग अधिक आहे. आयसीएफ डब्यांचा वेग १४० किमी प्रतितास आहे. तर, एलएचबी डब्यांचा वेग १६० किमी प्रतितास असून हा वेग २०० किमी प्रतितासापर्यंत वाढविता येतो.
जर्मनीहून आयात
देशात सर्वात पहिला एलएचबी डबा २००० मध्ये जर्मनीहून आयात केला होता. ते डबे शताब्दी एक्स्प्रेसला जोडण्यात आले. पंजाबमधील कपूरथळा येथील रेल्वे कोच कारखाना, चेन्नई येथील इंटिग्रल कोच कारखाना व उत्तर प्रदेशमधील रायबरेली येथील माॅडर्न कोच कारखान्यात एलएचबी डबे तयार केले जातात. भारतीय रेल्वे मार्गावरील सर्व रेल्वेगाड्यांचे आयसीएफ रेल्वेगाड्यांच्या जागी एलएचबी डबे जोडले जाणार आहेत.
