“या प्रकरणात माझी बहीण…”; नवाब मलिकांनी बहिणीसंदर्भात विचारलेल्या प्रश्नावर क्रांती रेडकरची प्रतिक्रिया

समीर वानखेडेंची मेहुणी ड्रग्जच्या व्यापारात गुंतलेली होती का? असा सवाल नवाब मलिक यांनी विचारला आहे

Kranti Redakar reaction to the question asked by Nawab Malik regarding his sister
क्रांती रेडकरने ट्विट करत नवाब मलिकांना उत्तर दिले आहे

आर्यन खान ड्रग्ज प्रकरणात राज्याचे अल्पसंख्याक मंत्री आणि राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी समीर वानखेडेवर आणखी एक आरोप केला आहे. नवाब मलिक यांनी समीर वानखेडे यांना त्यांची मेहुणी हर्षदा दीनानाथ रेडकर ड्रग्जच्या व्यापारात गुंतलेली होती का, असा सवाल केला आहे. यासोबत मलिक यांनी कथित पुरावेही शेअर केले आहेत. त्यानंतर क्रांती रेडकरने याबाबत प्रतिक्रिया दिली आहे.

“मला माहित आहे की नवाब मलिक यांनी त्यांच्या ट्विटर हँडलवर केलेल्या ट्विटबद्दल तुम्हाला बरेच प्रश्न आहेत. मला सांगायचे आहे की या प्रकरणात माझी बहीण पीडित आहे. आमच्या कायदेशीर टीमच्या मते प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याने यावर टिप्पणी करणे योग्य ठरणार नाही. माझी बहीण मलिक यांच्या ट्विटला कायदेशीररित्या उत्तर देणार आहे. समीर वानखेडे यांचा या प्रकरणाशी काहीही संबंध नाही, असे क्रांती रेडकरने आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.

यासंदर्भात एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांनीही प्रत्युत्तर दिले आहे. “अशा प्रकरणात एका महिलेचे नाव लोकांसमोर प्रसारित करून खूप चांगले काम केलेस मित्रा. खरं तर, आम्ही जेव्हा प्रेस रिलीझ जारी करतो, तेव्हा आम्ही महिलांच्या प्रतिष्ठेचे रक्षण करण्यासाठी त्यांची नावे देखील शेअर करत नाही,” असं समीर वानखडे म्हणाले. तसेच “क्रांतीची बहीण हर्षदा रेडकर यांच्यावरची केस ही २००८ सालची आहे. त्यावेळी मी नोकरीतही नव्हतो. तसंच क्रांतीशी माझं लग्न २०१७ साली झालं. मग माझा या प्रकरणाशी काही संबंध कसा असेल?” असा सवाल वानखेडे यांनी उपस्थित केला आहे.

दरम्यान, नवाब मलिकांनी यासंदर्भात ट्वीट करत समीर वानखेडेंना प्रश्न विचारले होते. “समीर दाऊद वानखेडे, तुमची मेहुणी हर्षदा दिनानाथ रेडकर ही ड्रग्जच्या व्यवसायात सामील आहे का? तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर द्यावं लागेल कारण तिच्याविरोधातली केस पुणे कोर्टात प्रलंबित आहे,” असे नवाब मलिक यांनी म्हटले आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मुंबई बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Kranti redakar reaction to the question asked by nawab malik regarding his sister abn

Next Story
केरोसीन अनुदानाचे वितरण बँक खात्यांच्या माध्यमातून- अनिल देशमुख