राज्याचे अल्पसंख्याक मंत्री आणि राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांचं गेल्या काही दिवसांपासून NCB चे विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्यावर आरोप करण्याचं सत्र सुरू आहे. अभिनेता शाहरुख खान याचा मुलगा आर्यनच्या अटकेपासून सुरू झालेलं हे आरोप सत्र अजूनही सुरूच आहे. यात वानखेडेंची पत्नी अभिनेत्री क्रांती रेडकरही आली आहे. मलिक आणि वानखेडे प्रकरणावरुन क्रांती आणि नवाब मलिकांच्या मुलीतही ट्वीटरयुद्ध झाले. त्यानंतर आता नवाब मलिकांनी पुन्हा एकदा क्रांती रेडकरच्या चॅटच्या स्क्रिनशॉट शेअर करत निशाणा साधला आहे. त्यावरुन क्रांतीने आता प्रतिक्रिया दिली आहे.

क्रांतीने हेच स्क्रिनशॉट पुन्हा शेअर केले आहेत. तसंच हे फेक अकाऊंट असल्याचंही उघड केलं आहे. मलिक यांनी शेअर केलेला संवाद हा ट्विटरवरील आहे. यामध्ये एका युजरने क्रांती रेडकरला माझ्याकडे नवाब मलिक यांचे काही फोटो असल्याचं सांगितलं आहे. यावर क्रांतीने आता हे कुठल्या थराला चाललंय असं ट्वीट करत खेद व्यक्त केला आहे.

काय आहे या चॅटमध्ये?

“क्रांती रेडकर मॅडम माझ्याकडे नवाब मलिक आणि दाऊद यांचा संबंध असल्याचे पुरावे आहेत, अधिक माहितीसाठी थेट मेसेज करा,” असं या युझरने म्हटलं आहे. त्यावर रात्री पावणे अकराच्या सुमारास क्रांती रेडकरने, “तुमच्याकडे काय पुरावे आहेत?”, असा रिप्लाय केला आहे. “माझ्याकडे नवाब मलिक आणि दाऊद यांचा फोटो आहे,” असं या युझरने म्हटलंय. त्यावर पुढच्या मिनिटालाच क्रांतीने, “कृपया तो फोटो पाठव. याबदल्यात तुला योग्य तो मोबदला मिळेल,” असा रिप्लाय केलाय. या संवादाचा स्क्रीनशॉर्ट मलिक यांनी, “अरे देवा…” अशा कॅप्शनसहीत शेअर केला आहे.