मुंबई एनसीबीचे संचालक समीर वानखेडे यांची पत्नी आणि अभिनेत्री क्रांती रेडकरने पुन्हा एकदा राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांच्यावर हल्लाबोल केलाय. यावेळी क्रांतीने ट्वीट करत दोन फोटो ट्वीट केलेत. हे फोटो समीर वानखेडे यांच्या मालिकीच्या रेस्टॉरंट अँड बारचे आहेत. पहिल्या फोटोत नवाब मलिकांच्या ट्वीटचा स्क्रिनशॉट आहे, तर दुसऱ्यात क्रांतीने या बारबाबत तिची माहिती दिलीय. तसेच नवाब मलिक यांच्यावर ‘फर्जीवाडा’ हा त्यांचाच शब्द वापरून हल्ला चढवलाय.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

क्रांती रेडकर म्हणाली, “पहिल्या फोटोत बारचा दावा करण्यात आलाय. दुसऱ्या फोटोत सदगुरू फॅमिली रेस्टॉरंट अँड बार दिसत आहे. पुन्हा एकदा ‘फर्जीवाडा'”. या लोकांचा कितीवेळा पर्दाफाश करायचा. जबाबदार पदावर बसून हे असं वागत आहेत. हे केवळ समीर वानखेडे यांचं नाव खराब करण्यासाठी सुरू आहे.”

नवाब मलिक यांनी बारबाबत काय आरोप केले होते?

नवाब मलिक यांनी समीर वानखेडे यांच्यावर निशाणा साधत वानखेडे हे मुंबईमधील एका बार आणि रेस्तराँचे मालक असल्याचा दावा मलिक यांनी केला होता. ट्विटरवर सद्गुरु रेस्ट्रो बारचा फोटो शेअर करत मलिक यांनी निशाणा साधला. “समीर दाऊद वानखेडे यांचे हे फर्जीवाडा केंद्र आहे,” अशा कॅप्शनसहीत नवाब मलिक यांनी हा फोटो शेअर केला होता.

नवाब मलिकांच्या आरोपांवर समीर वानखेडे काय म्हणाले?

वानखेडे यांनी टाइम्स ऑफ इंडियाशी बोलताना आपण भारतीय महसूल सेवेमध्ये (आयआरएस) रुजू झाल्यापासून हा परवाना आपल्या नावे असल्याचं स्पष्ट केलं आहे. या परवान्यासंदर्भातील कायदेशीर हक्क हे समीर यांचे वडील ज्ञानदेव वानखेडे यांच्याकडे देण्यात आलेत.

हेही वाचा : वाशीमधील ‘त्या’ बारचे मालक आपणच असल्याचं सांगत समीर वानखेडे म्हणाले, “मी २००६ पासूनच…”

“यात बेकायदेशीर असं काहीच नाहीय. मी सेवेमध्ये रुजू झालोय तेव्हापासून म्हणजेच २००६ सालापासून या बार आणि रेस्तराँरंटचा उल्लेख माझ्या वर्षीक स्थावर मालमत्तेमध्ये करत आहे. तसेच या परवान्याबद्दलचाही उल्लेख मी संपत्तीच्या हिशोबात मांडलाय. या उद्योगामधून मिळणाऱ्या कामाईचा सर्व उल्लेख मी प्राप्तीकर परताव्याच्या कागदपत्रांमध्ये केलाय,” असं वानखेडे म्हणालेत.

कुठे आहे हा बार

टाइम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार समीर वानखेडे यांच्या नावे बार आणि रेस्तराँचा परवाना आहे. नवी मुंबईमधील वाशी येथे हा बार आहे. उत्पादन शुल्क विभागाच्या अहवालानुसार वाशीमधील सद्गुरु हॉटेलचा परवाना वानखेडे यांच्या नावे आहेत. हा परवाना २७ ऑक्टोबर १९९७ रोजी जारी करण्यात आला आहे. तसेच हा परवाना रिन्यू करण्यात आला असून सध्या तो ३१ मार्च २०२२ पर्यंत पात्र आहे. या बारमध्ये परदेशी तसेच भारतीय बनावटीच्या दारुची विक्री करण्यास परवानगी देण्यात आलीय.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Kranti redkar tweet 2 photos of sadguru restaurant and bar and criticize nawab malik pbs
First published on: 21-11-2021 at 08:59 IST