मुंबई : कृषी विभागाच्या आकृतीबंधावरून निर्माण झालेला पेच अद्याप कायम आहे. महिनाभरापासून कर्मचारी संघटनेचे प्रतिनिधी कृषिमंत्री, सचिव आणि आयुक्तांशी चर्च करीत आहेत. त्यानंतरही प्रश्न कायम राहिल्यामुळे सोमवारी पुण्यात धरणे आंदोलन करण्यात आले. आंदोलनाला कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी भेट दिल्यानंतरही आंदोलकांचे समाधान झाले नाही, त्यामुळे आज, मंगळवारी मंत्रालयात कृषिमंत्र्यांनी सचिव, आयुक्त आणि कर्मचारी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक बोलविली आहे.
राज्य सरकारने तब्बल १७ वर्षांनंतर ११ ऑगस्ट रोजी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत कृषी विभागाचा आकृतीबंध मंजूर केला. पण, मंजुरीनंतर आकृतीबंधा बाबत कर्मचारी संघटनांनी उपस्थितीत केलेल्या शंकाचे निरसन कृषी विभागाच्या प्रशासनाला करता आले नाही. महिनाभर सचिव, आयुक्त आणि कृषिमंत्र्यांनी अनेकदा बैठका घेऊन, संघटनेशी चर्चा करूनही आकृतीबंधावरून निर्माण झालेला पेच कायम आहे.
आकृतीबंधाबाबत आम्हाला विश्वासात घेतले नाही. बैठका घेऊनही आम्हाला ठोस काहीच सांगितले जात नाही. बैठकांमध्ये दिलेली आश्वासने पाळली जात नाहीत, असा आरोप करून कर्मचारी संघटनेने पुण्यात धरणे आंदोलन पुकारले होते. कृषी आयुक्तालयासमोर राज्यभरातील हजारांहून जास्त कृषी अधिकारी, कर्मचारी आंदोलनासाठी आले होते. कृषी महासंघाच्या मागण्या मान्य करण्यासाठी कृषी पदवीधर संघटनेचे संस्थापक अध्यक्ष अॅड. अनंत तोंदे – पाटील दोन दिवसांपासून उपोषणास बसले आहेत.
कृषिमंत्री भरणे यांनी उपोषण स्थळीला भेट देऊन तोडगा काढण्याचे आश्वासन दिले. मात्र, प्रस्तावित आकृतीबंध रद्द करणार का, दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करणार का, आकृतीबंध पुन्हा तयार करण्यासाठी तज्ज्ञ समिती नेमणार का, या विषयी कृषिमंत्र्यांनी कोणतेही ठोस आश्वासन दिले नाही. मागण्या मान्य होणार नाहीत तोपर्यंत प्रस्तावित आंदोलन सुरू राहील, असा इशारा कृषी सेवा महासंघाचे अध्यक्ष बाबासाहेब जेजुरकर यांनी दिला आहे.
कृषी सेवा महासंघाच्या प्रमुख तीन मागण्या प्रस्तावित आकृतीबंध तत्काळ रद्द करावा.
सर्वसमावेशक आकृतीबंधासाठी तज्ज्ञ समिती नेमावी. शेतकरी केंद्रित व भविष्याच्या दृष्टीने नवा आकृतीबंध तयार करा. आकृतीबंध शेतकरी हिताचा नसतानाही शासनाची दिशाभूल करणाऱ्या दोषी अधिकाऱ्यांवर तत्काळ कारवाई करा.
आंदोलन सुरूच राहील
कृषिमंत्र्यांकडून नवीन कोणतेही आश्वासन मिळाले नाही. जुनेच आश्वासन मिळाले. या पूर्वी चार बैठका झाल्या, पण निर्णय झाला नाही. उद्या मंत्रालयात होणाऱ्या बैठकीत काय निर्णय होणार हे अस्पष्ट आहे. त्यामुळे ठोस निर्णय होईपर्यंत आंदोलन सुरूच राहील, असा इशारा कृषी सेवा महासंघाचे प्रसिद्धी प्रमुख बाळासाहेब चापले यांनी दिला आहे.
कृषी विभाग, शेतकरी हिताचा निर्णय घेणार
आकृतीबंधावरून निर्माण झालेल्या शंकाचे निरसन करण्यासाठी मंत्रालयात बैठकीचे आयोजन केले आहे. सर्व कृषी कर्मचारी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून कृषी विभाग आणि शेतकरी हिताचा निर्णय घेतला जाईल, अशी माहिती कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली.
