मुंबई : भारतातून लुप्त झालेले चित्ते ७० वर्षांनी २०२२ मध्ये पुन्हा आफ्रिकेतून मध्य प्रदेश येथील कुनो राष्ट्रीय उद्यानात आणण्यात आले होते. त्याच अभयारण्यात आता तब्ब्ल ११३ वर्षांनी वनपिंगळा (फॉरेस्ट आउलेट) या पक्ष्याचे दर्शन झाले आहे. कुनो राष्ट्रीय उद्यानात वनपिंगळा पक्षाची शेवटची नोंद ११३ वर्षांपूर्वी म्हणजेच ब्रिटिश काळात १९१३ साली करण्यात आली होती.

वनपिंगळा हा पक्षी जगातील सर्वात दुर्मिळ शिकारी पक्ष्यांपैकी एक मानला जातो. या पक्ष्याच्या दर्शनामुळे पक्षीशास्त्रात एक महत्त्वपूर्ण नोंद झाली आहे. ही घटना सध्या सुरू असणाऱ्या ‘प्रोजक्ट चित्ता’ या उपक्रमाअंतर्गत अधिवास व्यवस्थापनाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण ठरू शकते, अशी माहिती प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) सुभारंजन सेन यांनी पीटीआय वृत्तसंस्थेला दिली. धोक्यात असणाऱ्या प्रजातींमधील वनपिंगळा पक्ष्याची नोंद प्रथमच कुनो राष्ट्रीय उद्यानात होत आहे, असेही सेन पुढे म्हणाले.

पक्षी निरीक्षक असणाऱ्या लभ यादव यांना वनपिंगळाचे प्रथम दर्शन कुनो राष्ट्रीय उद्यानातील पारोंद बीटमध्ये झाले. अतिशय दुर्मिळ असणाऱ्या या पक्ष्याच्या वैशिष्ट्यानुसार हा ‘वनपिंगळा’ आहे हे ठरवणे अवघड जात होते. यासाठी पुणे येथील एका वन्यजीव संस्थेची मदत घेण्यात आली. या संस्थेच्या अभ्यासकांनी हा पक्षी वनपिंगळाच असल्याचे शिक्कामोर्तब केल्यानंतर ११३ वर्षांनी पुन्हा एकदा अधिकृत नोंद कुनो राष्ट्रीय उद्यानात करण्यात आली. पक्षी संवर्धनासाठी हा चांगला संकेत मानला जात आहे.

पहिली नोंद १८७२ साली

या पक्ष्याची भारतातील प्रथम नोंद १८७२ साली करण्यात आली होती. हा पक्षी मध्य प्रदेश, महाराष्ट्र आणि गुजरातमधील वनक्षेत्रात आढळतो. राज्यातील नंदुरबार जिल्ह्यात १९९७ मध्ये या पक्षाचे दर्शन झाले होते. तेव्हा जागतिक स्तरावरील पक्षीशास्त्रज्ञांचे या घटनेने लक्ष वेधले होते. त्यांनतर २०१४ साली पक्षीअभ्यासकांना तानसा वन्यजीव अभयारण्यात या पक्ष्याचे दर्शन झाले होते. ठाणे आणि पालघर जिल्ह्यांतील काही तालुक्यांमध्येही या पक्ष्याचा अधिवास आहे.

वनपिंगळा पक्षाची वैशिष्ट्ये काय ?

वनपिंगळा हा इतर घुबडांपेक्षा वेगळा असून तो प्रामुख्याने दिवसा सक्रिय असतो. तो सकाळी ६ ते १० या वेळेत अधिक सक्रिय असतो. वनपिंगळा पक्ष्याचा आकार लहान ते मध्यम असतो. या पक्षाचे डोके गोलसर, तर डोळे काहीसे पिवळसर असतात. तपकिरी आणि करड्या रंगावरील पांढऱ्या रंगामुळे हे घुबड वेगळे दिसते. कीटक, सरडे, लहान उंदीर आणि छोटे पक्षी हे या पक्षाचे मुख्य अन्न आहे.