कुर्ला पश्चिमेला रेल्वे स्थानकाजवळ शुक्रवारी सकाळी दोन बेस्ट बसेसचा विचित्र अपघात झाला. या अपघातात एक महिलेला आपल्या प्राणांना मुकावे लागले. बेस्ट बस मागे घेत असताना दुसऱ्या बसला धडकली. त्यात महिलेचा मृत्यू झाला. अपघातानंतर महिलेला लगेचच जवळच्या रुग्णालयात नेण्यात आले पण डॉक्टरांनी तपासल्यानंतर महिलेला मृत घोषित केले.

खरंतर कंडक्टरच्या मदतीशिवाय चालकाने बस मागे घेऊ नये. कारण असे केल्यास अपघात घडण्याची शक्यता असते. यापूर्वी सुद्धा चालकाने कंडक्टरच्या मदतीशिवाय बस मागे घेतल्यामुळे काही अपघात झाले आहेत. या अपघातात सुद्धा चालकाच्या बरोबरीने कंडक्टरची चुकी असण्याची दाट शक्यता आहे.

ज्या भागात हा अपघात घडला तो वर्दळीचा रस्ता आहे. नेहमीच इथे वाहतूक कोंडीची स्थिती असते. त्यामुळे अशा परिसरात बस मागे घेताना प्रचंड काळजी घेण्याची गरज आहे.