मुंबई : कुर्ल्यातील नाईक नगर सोसायटीमध्ये तीनच दिवसांपूर्वी राहायला आलेल्या कुटुंबावर काळाने घाला घातला आहे.नेहरु नगरमधील कस्तुरबा इमारत मोडकळीस आल्याने बलिया कुटुंबाला येथील घर एका रात्रीत सोडावे लागले. लगेचच दुसरे घर मिळत नसल्याने ते शनिवारच नाईक नगर सोसायटीमध्ये वास्तव्यासाठी आले होते. तीन दिवसांनी ही दुर्घटना घडली.
माझा दीर, त्याची बायको आणि १७ वर्षांचा मुलगा इमारतीमध्ये दुसऱ्या मजल्यावर राहत होते. तीन दिवसापूर्वीच राहायला आल्याने आम्ही त्यांचे घरही पाहिले नव्हते. सोमवारी रात्री ही दुर्घटना घडल्याचे समजल्यावर आम्ही धावत तेथे गेलो. माझी जाऊ देवकी बलिया आणि तिचा १७ वर्षांचा प्रीत यांना बाहेर काढण्यात यश आले. परंतु दिरांबाबत काहीच समजलेले नाही. दुर्घटना घडल्यानंतर बराच काळ झाला. त्यामुळे आम्हाला काळजी वाटत आहे, असे बलिया कुटुंबीयांनी सांगितले.
आम्ही घरात झोपलो होतो. अचानक जमीन हलल्यासारखी झाली आणि एकदम कोसळायला सुरुवात झाली. आमच्या घरातील एका खांब लावून थोडा वेळ कोसळणारे छत सावरले आणि बाहेर धावत सुटलो. माझ्या मागे आईपण धावत आली. परंतु माझ्या बाबांना पायाला दुखापत असल्याने त्यांना बाहेर पडता आले नाही. सर्व घर त्यांच्यावर कोसळले, असे प्रीतने सांगितले.
प्रीत आणि त्याची आई देवकी जखमी झाले असून त्यांना राजावाडी रुग्णालयात दाखल केले आहे. सामान अंगावर पडल्याने त्यांच्या छातीला आणि पायाला मार लागला आहे. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे रुग्णालय प्रशासनाने सांगितले.