मुंबई : कुर्ल्यातील अशोक नगर येथे दरड कोसळून झालेल्या अपघातातील मृतांची संख्या आठवर पोहोचली आहे. सद्दाम वझीर अली (वय २८) याचा मृतदेह गुरुवारी दुपारी ढिगाऱ्याखालून बाहेर काढण्यात आला. राजावाडी रुग्णालयातील डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.

कुर्ल्यातील अशोक नगर येथील टेकडी क्रमांक ३ वरील गौसिया चाळीतील काही घरांवर मंगळवारी मध्यरात्री डोंगरउतारावरील मातीचा भाग कोसळून अनेक जण गाडले गेले. मातीच्या ढिगाऱ्याखाली अडकलेल्या बाहेर काढण्यासाठी बुधवारी रात्री उशिरापर्यंत राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद पथक (एनडीआरएफ) व अग्निशमन दलातर्फे बचावकार्य सुरू होते.

या दुर्घटनेत सात जणांचा मृत्यू झाला होता, तर सात जण जखमी झाले होते. एका व्यक्तीचा शोध सुरू होता. गुरुवारी दुपारी या व्यक्तीचा मृतदेह ढिगाऱ्यातून बाहेर काढण्यात आला. त्यामुळे मृतांची संख्या आठ वर गेली आहे. ढिगाऱ्याखालून सर्व मृतदेह व जखमींना बाहेर काढण्यात आले असून एनडीआरएफने गुरुवारी दुपारी मदतकार्य थांबवले. त्यानंतर मुंबई महापालिकेने आता ढिगारा हटवण्याचे काम हाती घेतले आहे.

या दुर्घटनेनंतर अशोक नगर येथील दरडीवरील धोकादायक सुमारे १०० घरे रिकामी करण्यात आली आहेत. त्यापैकी ६० ते ७० लोकांची राहण्याची व खाण्याची सोय महापालिकेच्या काजूपाडा हिंदी शाळेत व मोहिली गाव शाळेत करण्यात आली आहे. तर काही जण त्यांच्या नातेवाईकांकडे गेले असल्याची माहिती पालिकेच्या अधिकाऱ्यांनी दिली.

या दुर्घटनेत प्राण गमावलेल्या प्रत्येक व्यक्तीच्या वारसाला ४ लाख रुपयांची तातडीची आर्थिक मदत तर जखमी झालेल्या प्रत्येक व्यक्तीला वैद्यकीय उपचारासाठी ५० हजार रुपयांची मदत देण्याची घोषणा महापौर रितू तावडे यांनी केली.

दरम्यान, या प्रकरणी दोन महिन्यांपूर्वी पालिकेच्या सभागृहात याच वस्तीबद्दल चर्चा उपस्थित करण्यात आली होती. मात्र प्रशासनाने या प्रकरणी दुर्लक्ष केल्याचा आरोप स्थानिक नगरसेवक विजयेंद्र शिंदे यांनी केला आहे. याच वस्तीचा उतार इतका जास्त आहे, की सुरक्षेकरीता जिओ नेटिंग अर्थात जाळ्या बसवण्याची मागणीही केल्याचे शिंदे यांनी सांगितले. त्याकरिता म्हाडाला प्रस्ताव पाठवण्याबाबतही मागणी केली होती. मात्र, प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप शिंदे यांनी केला आहे.

तसेच या उतारावरील कुटुंबांचे कायमस्वरूपी स्थलांतर करून त्यांचे पुनर्वसन करण्याची मागणीही केल्याचा दावा शिंदे यांनी केला आहे. ही दुर्घटना घडली ती जागा आणि तेथे पोहोचण्याचा मार्ग हा फक्त एक व्यक्तीच जाऊ शकेल एवढा अरुंद आहे.

दरम्यान, मुंबई महापालिका सभागृहाची बैठक गुरुवारी तहकूब करण्यात आली. कुर्ला येथील दरड दुर्घटनेतील आठ मृतांना व विलेपार्ले येथील गगनचुंबी इमारतीत लागलेल्या आग दुर्घटनेतील दोन मृतांना श्रद्धांजली वाहण्यात आली.