मुंबई: कुर्ल्याच्या गौसिया चाळ परिसरात राहणारा कमल अन्सारी याच्या १४ वर्षीय मुलाचा कुर्ला दुर्घटनेत बुधवारी मृत्यू झाला. दरड कोसळल्यानंतर बहिणीच्या दोन मुलांना त्याने सुरक्षित बाहेर काढले. मात्र स्वतःच्या मुलाला वाचवू न शकल्याची खंत त्याला सतावते आहे.
गौसिया चाळीतच कमल देखील कुटुंबीयांसह राहतो. त्याची बहिण त्याच परिसरात राहते. मंगळवारी रात्री त्याचा मुलगा समीर अन्सारी हा कमलच्या बहिणीच्या घरी झोपण्यासाठी गेला होता. मात्र पहाटे ही घटना घडल्यानंतर कमलने तत्काळ बहिणीच्या घराकडे धाव घेतली. त्यावेळी बहिणीच्या घरावर मोठा मातीचा ढिगारा पडला होता. त्याने तात्काळ धडपड करून बहिणीच्या दोन मुलांना सुरक्षित बाहेर काढले. मात्र बराच वेळ शोध घेऊनही त्याचा मुलगा त्याला मिळत नव्हता.
अखेर अग्निशमन दल आणि राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाच्या (एनडीआरएफ) जवानांनी ढिगाऱ्याखाली अडकलेल्या नागरिकांचा शोध घेण्यास सुरुवात केली. त्यानंतर दुपारी चारच्या सुमारास त्यांना समीरचा मृतदेह मिळाला. त्यांनी तात्काळ त्याला राजावाडी रुग्णालयात दाखल केले. मात्र रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता. आपण आपल्या मुलाला वाचवू शकलो नाही याची खंत त्याला असून मुलाच्या जाण्याने त्याच्यावर सध्या दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
