मुंबई : मित्रांसोबत खेळत असताना १२ वर्षांचा मुलगा दहाव्या मजल्यावरील अचानक उघडलेल्या उद्वाहकाच्या बाहेरील दरवाजातून तिसऱ्या मजल्यावर उभ्या असलेल्या उद्वाहकावर पडल्याची घटना सोमवारी रात्री कुर्ला परिसरात घडली. या दुर्घटनेत सदर मुलाचा मृत्यू झाला असून या प्रकरणी नेहरूनगर पोलीस अधिक तपास करीत आहेत.
कुर्ला नेहरूनगर येथील शमीम सोसायटीमध्ये सोमवारी रात्री ८ च्या सुमारास ही घटना घडली. याच इमारतीच्या दहाव्या मजल्यावर राहणारा जमिर शेख (१२) मित्रांसोबत घराबाहेरील मोकळ्या जागेत खेळत होता. यावेळी तो इमारतीमधील उद्वाहकाच्या दरवाज्याजवळ उभा होता. मात्र अचानक उद्वाहकाच्या बाहेरील दरवाजा उघडला. त्यानंतर जमिर १० व्या मजल्यावरून तिसऱ्या मजल्यावर उभ्या असलेल्या उद्वाहकावर पडला.
जोरात आवाज झाल्यामुळे स्थानिक रहिवाशांनी बाहेर धाव घेतली. त्यांना जमिर खाली पडल्याची माहिती मिळाली. रहिवाशांनी तत्काळ त्याला बाहेर काढले आणि एका खासगी रुग्णालयात दाखल केले. मात्र त्याची प्रकृती गंभीर असल्याने त्याला तत्काळ शीव रुग्णालयात दाखल करण्यात आले. रुग्णालयात उपचार सुरू करण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणी नेहरूनगर पोलिसांनी अपघाताची नोंद करून तपास सुरू केला.
तक्रारीकडे दुर्लक्ष
शमीम सोसायटीमधील उद्वाहकामध्ये गेल्या सात ते आठ महिन्यांपासून वारंवार बिघाड होत आहेत. याबाबत अनेकदा सोसायटीकडे तक्रार केली. मात्र सोसायटीने या ठिकाणी दुर्लक्ष केल्याने ही दुर्घटना घडली असल्याचा आरोप रहिवाशांकडून करण्यात येत आहे.
