मुंबई : धारावी पुनर्विकास प्रकल्पाअंतर्गत कुर्ला मदर डेअरीच्या जागेवर धारावीतील अपात्र रहिवाशांसाठी भाडेतत्त्वावरील घरांची निर्मिती केली जाणार आहे. त्यानुसार महिनाभरात येथील ४००० घरांच्या प्रत्यक्ष बांधकामाला सुरुवात केली जाईल. पहिल्या टप्प्यात २०३० पर्यंत पुनर्वसन घटकाअंतर्गत दहा हजार घरे बांधून पूर्ण करण्याचे धारावी पुनर्विकास प्रकल्पाचे (डीआरपी) नियोजन आहे.

धारावी पुनर्विकास प्रकल्पाअंतर्गत पात्र धारावीकरांचे पुनर्वसन केले जाईल. शिवाय पहिल्यांदाच झोपडपट्टी पुनर्वसन योजनेअंतर्गत अपात्र रहिवाशांचेही पुनर्वसन धारावी पुनर्विकास प्रकल्पात केले जाणार आहे. अपात्र रहिवाशांना धारावीबाहेर भाडेतत्त्वावरील गृहयोजनेतील घरे दिली जातील. त्यासाठी डीआरपीकडून मुंबईतील विविध ठिकाणच्या मोकळ्या जागेची मागणी करण्यात आली आहे. त्यानुसार मुलुंड, कुर्ला मदर डेअरीसह अन्य ठिकाणची जागा डीआरपीला गृहनिर्मितीसाठी देण्यात आली आहे.

उपलब्ध जागेवर घरबांधणीच्या दृष्टीने डीआरपी व अदानी समूहाच्या अदानी नवभारत डेव्हलपर्स प्रायव्हेट लिमिटेडकडून (एएनडीपीएल) पुढील कार्यवाही सुरू आहे. त्यानुसार आता कुर्ला मदर डेअरीच्या जागेवर ४००० घरे बांधण्याच्या कामास महिन्याभरात सुरुवात केली जाणार असल्याची माहिती डीआरपीचे सचिव विपीन पालीवाल यांनी ‘लोकसत्ता’ला दिली.

कुर्ला मदर डेअरी येथील सुमारे २१ एकर जागा डीआरपीला देण्यात आली असून यातील काही एकर जागा डीआरपीकडे हस्तांतरित झाली आहे. तेव्हा उपलब्ध जागेवर पुनर्वसन घटकाअंतर्गत अपात्र रहिवाशांसाठी ४००० घरे बांधली जातील. दरम्यान पहिल्या टप्प्यात १० हजार घरांचे काम हाती घेत ही घरे २०३०पर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन आहे. त्यानुसार माटुंग्यातील रेल्वेच्या जागेवर सध्या काही घरांचे काम सुरू असून हे काम ५० टक्क्यांहून अधिक पूर्ण झाले आहे.

स्थानिकांची उद्यानाची मागणी

कुर्ला मदर डेअरीची जागा धारावीकरांच्या पुनर्वसनासाठी देण्यास स्थानिकांचा विरोध आहे. ही जागा धारावीला न देता या जागेचा वापर उद्यान म्हणून करण्याची स्थानिकांची मागणी आहे. या मागणीसाठी स्थानिकांकडून जनआंदोलनही उभे करण्यात आले आहे. मात्र स्थानिकांचा विरोध डावलून आता कुर्ला मदर डेअरीतील घरांच्या कामाला सुरुवात होणार आहे.