मुंबई : मागील काही दिवसांपासून मुंबईच्या हवा प्रदूषणात वाढ झाली असून यामुळे शहराचा सरासरी हवा गुणवत्ता निर्देशांक ‘मध्यम’ श्रेणीत नोंदला जात आहे. समीर ॲपच्या नोंदीनुसार, गुरुवारी शहराचा सरासरी हवा गुणवत्ता निर्देशांक ‘समाधानकारक’ श्रेणीत नोंदला गेला असला तरीही शहरातील सर्वाधिक प्रदूषित हवा कुर्ला येथे नोंदली गेली. येथील हवा गुणवत्ता निर्देशांक २८४ म्हणजेच ‘वाईट’ श्रेणीत होता.
मुंबई शहर आणि उपनगरांतील नागरिकांची काही दिवसांपूर्वी धुरकट वातावरणातून सुटका झाली होती. मात्र, बुधवारपासून शहरातील धुरकट वातावरणात पुन्हा वाढ झाली आहे. धुरकट वातावरणाचा परिणाम हवेच्या गुणवत्तेवरही होत असतो. या नैसर्गिक कारणासोबतच वाहतूक प्रदूषण, बांधकाम प्रकल्प, शहरात सुरु असणारी विकास कामे या मानवनिर्मिती कारणांचा परिणामही हवेच्या गुणवत्तेवर होत असतो. सध्या मुंबईत उन्हाचा तडाखाही वाढला असून त्यात आता पुन्हा हवा प्रदूषणात वाढ झाल्याने मुंबईकरांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. शहरात वाऱ्याचा वेग वाढला की हवेच्या गुणवत्तेत तात्पुरती सुधारणा होत असते. मात्र वाऱ्याचा वेग मंदावला की पुन्हा त्याचा परिणाम हवेच्या गुणवत्तेवर होत असतो.
गुरुवारी शहरातील सर्वाधिक प्रदूषित हवा कुर्ला येथे नोंदली गेली. सकाळपासूनच येथील हवा गुणवत्ता निर्देशांक ‘वाईट’ श्रेणीत नोंदला जात होता. संध्याकाळपर्यंत येथील हवा गुणवत्ता निर्देशांक २८४ म्हणजेच ‘वाईट’ श्रेणीत होता. येथील हवेत आरोग्यास हानिकारक असणाऱ्या पीएम २.५ आणि पीएम १० चे प्रमाण सर्वाधिक होते. बुधवारी १२३ वर असणारा हवा गुणवत्ता निर्देशांक थेट २८४ वर पोहोचल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. संध्याकाळनंतरही येथील हवेच्या गुणवत्तेत सुधारणा झाली नाही. प्रशासन पातळीवर विवध उपाययोजना केल्या जात असल्या तरीही हवेची गुणवत्ता सातत्याने खालवत आहे. यामुळे नागरिकांना आरोग्यविषयक समस्यांचा सामाना करावा लागत आहे.
इतर भागातील स्थिती काय?
समीर ॲपच्या नोंदीनुसार, पवई येथील हवा गुणवत्ता निर्देशांक ‘मध्यम’ श्रेणीत म्हणजे १०१ इतका होता. वांद्रे कुर्ला संकुल – १२४, बोरिवली पूर्व – १०३, चकाला (अंधेरी पूर्व ) – १२३, मालाड पश्चिम – १०८, भायखळा – १०१, देवनार येथील हवा गुणवत्ता निर्देशांक १०५ इतका होता. या भागातील हवा सातत्याने ‘मध्यम’ श्रेणीत नोंदली जात आहे. तर बहुतांश भागातील हवा ‘समाधानकारक’ श्रेणीत होती. तर कांदिवली पूर्व येथील हवेची नोंद ‘चांगल्या’ श्रेणीत झाली.
