मुंबई : कुर्ला येथील एलबीएस मार्गावरील शीतल तलावात शुक्रवारी दुपारी १२ च्या सुमारास बुडून १९ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला. आदित्य तायडे असे मृत तरुणाचे नाव आहे.
दुर्घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या जवान, पोलीस तसेच संबंधित पालिका विभाग कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. अग्निशमन दलाने तलावात मुलाचा शोध घेण्यास सुरुवात केली. मात्र, मुलगा सापडला नाही. अखेर अग्निशमन दलाने राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाला (एनडीआरएफ) पाचारण केले. त्यांनतर एनडीआरएफच्या जवानांनी तलावात शोधमोहीम राबवली. अथक प्रयत्नांनंतर मुलाला बाहेर काढण्यात यश आले. उपचारासाठी त्याला नजीकच्या राजावाडी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
दरम्यान, मुलाने आत्महत्या केली, की घातपात झाला, याबाबत पोलिसांकडून सखोल चौकशी सुरू आहे.
