मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) सांताक्रूझ – चेंबूर जोडरस्ता विस्तार प्रकल्प हाती घेतला असून या प्रकल्पांतर्गत कुर्ला – वाकोला उड्डाणपुलाची उभारणी करण्यात येत आहे. आतापर्यंत या पुलाचे ७८ टक्के काम पूर्ण झाले आहे. उर्वरित कामे जलदगतीने पूर्ण करून हा उड्डाणपूल वाहतुकीसाठी खुला करण्यात येईल. त्यामुळे कुर्ला आणि वाकोला परिसरातील वाहतूक कोंडीचा प्रश्न सोडविण्यात यश मिळेल आणि या परिसरातून झटपट पश्चिम द्रुतगती मार्गावर पोहोचणे शक्य होईल, असा विश्वास एमएमआरडीएमधील अधिकाऱ्यांनी व्यक्त केला.
सांताक्रूझ – चेंबूर जोडरस्ता विस्तार प्रकल्पाअंतर्गत कुर्ला – वाकोला उड्डाणपुलाचे बांधकाम सुरू करण्यात आले आहे. पूर्व आणि पश्चिम द्रुतगती मार्ग जोडण्यासाठी, तसेच वाहतूक कोंडी टाळून कुर्ला येथून वाकोल्याला जाता यावे या उद्देशाने या उड्डाणपुलाची उभारणी करण्यात येत आहे. सुरुवातीला १.६६ कि.मी. लांबीचा आणि १७.५ मीटर रुंदीचा चार पदरी आणि पुढे ८.५ कि.मी. लांबीचा आणि ८.५ मीटर रुंदीचा दोन पदरी मार्ग या उड्डाणपुलावर असेल. कुर्ला ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर जंक्शन दरम्यान चार पदरी, तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर जंक्शन ते वाकोला दरम्यान दोन पदरी उड्डाणपूल आहे.
आतापर्यंत या उड्डाणपुलाचे ७८ टक्के बांधकाम पूर्ण झाले आहे. उर्वरित कामे जलदगतीने पूर्ण करून हा उड्डाणपूल वाहतुकीसाठी खुला करण्यात येईल, असे एमएमआरडीएच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.