मुंबई: कुर्ला परिसरात टिळक नगर नाल्याच्याजवळ शनिवारी जलवाहिनी फुटल्यामुळे तब्बल दोन दिवस पाणी पुरवठा विस्कळीत झाला होता. सोमवारी दुरुस्ती पूर्ण झाल्यानंतर कमी दाबाने पाणी पुरवठा सुरु झाला. जलवाहिनी फुटल्या प्रकरणी चौकशी आणि पोलीस तक्रार करा अशी मागणी नगरसेवक आमीर खान यांनी केली आहे.

कुर्ल्यातील ९० फूट रस्ता, टिळक नगर नाल्याजवळ सुरू असलेल्या पुलाच्या पुनर्बांधणी व रुंदीकरणाच्या कामादरम्यान महानगरपालिकेची १२०० मिमी व्यासाची मुख्य जलवाहिनी शनिवारी रात्री फुटली. जलवाहिनीचे नुकसान झाल्याप्रकरणी संबंधित कंत्राटदार आणि अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी प्रभाग क्रमांक १६२ चे नगरसेवक आमिर नसीम खान यांनी मुंबई महानगरपालिका आयुक्त अश्विनी भिडे यांच्याकडे केली आहे. सविस्तर तक्रार दाखल करून विभागीय चौकशी, नुकसानभरपाईची वसुली, कंत्राटदारांना काळ्या यादीत टाकणे (ब्लॅकलिस्टिंग), दक्षता चौकशी (व्हिजिलन्स इन्क्वायरी) आणि एफआयआर नोंदविण्याची मागणी खान यांनी केली आहे.

शनिवारी ६ जून २०२६ रोजी पुलाच्या कामादरम्यान मुख्य जलवाहिनीचे नुकसान झाल्याने मोठ्या प्रमाणात शुद्ध पाण्याची गळती झाली. परिणामी कुर्ला, साकीनाका आणि लगतच्या परिसरातील अंदाजे २ ते ३ लाख नागरिकांचा पाणीपुरवठा खंडित झाला. रविवारी एकूण ११ प्रभागांचा पाणीपुरवठा बंद होता.

काम सुरू करण्यापूर्वी जलवाहिनीचे अचूक स्थान निश्चित करणे, उपयोगिता वाहिन्यांचे मॅपिंग करणे, जल अभियंता विभागाशी समन्वय साधणे आणि आवश्यक सुरक्षा उपाययोजना राबविणे याबाबत गंभीर निष्काळजीपणा झाल्याचा आरोप खान यांनी केला आहे.

तसेच संबंधित अधिकाऱ्यांनी आणि कंत्राटदारांनी आवश्यक दक्षता न घेतल्यामुळे ही घटना घडल्याचा दावा खान यांनी केला आहे. या घटनेमुळे महापालिकेचे मोठे आर्थिक नुकसान झाले असून, दुरुस्ती खर्च, पाण्याची नासाडी, आपत्कालीन यंत्रणा व टँकर तैनातीचा खर्च यांचा हिशोब करून संबंधितांकडून वसुली करण्याची मागणी खान यांनी केली आहे.

याशिवाय संबंधित उपमुख्य अभियंता, कार्यकारी अभियंता, सहाय्यक अभियंता, कनिष्ठ अभियंता आणि पर्यवेक्षण अधिकाऱ्यांची जबाबदारी निश्चित करून त्यांच्यावर विभागीय कारवाई करावी, तसेच दोषी आढळणाऱ्या कंत्राटदारांना काळ्या यादीत टाकण्याची कारवाई करावी, अशी मागणीही करण्यात आली आहे.

या प्रकरणात भारतीय न्याय संहिता, सार्वजनिक मालमत्तेच्या नुकसान प्रतिबंधक कायदा आणि इतर लागू कायद्यांनुसार गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली असून, ही बाब गंभीर सार्वजनिक हिताची असल्याने तातडीने कारवाई करावी, असे खान यांनी आपल्या निवेदनात म्हटले आहे.

अवघड दुरुस्ती

या कामादरम्यान एका बाजूस ३०० मिलिमीटर व्यासाची महानगर गॅस लिमिटेडची (MGL) गॅसवाहिनी तर दुसऱ्या बाजूस पुलाचे पाइल फाउंडेशन असल्यामुळे खोदकामात तांत्रिक अडचणी निर्माण झाल्या होत्या. त्यामुळे दुरुस्तीला तब्ब्ल ४८ तास लागले.