‘पेटीएम’साठी पडताळणी करण्याच्या बहाण्याने दुसऱ्याच अ‍ॅपद्वारे फसवणूक

वैयक्तिक तपशिलांची नोंदणी म्हणजेच ‘केवायसी’ न केल्यास पेटीएम खाते बंद होईल, अशी धमकी देत ऑनलाइन भामटय़ांनी एका व्यावसायिकाला सुमारे तीन लाख रुपयांचा गंडा घातला.

भामटय़ांनी व्यावसायिकाला भीती घातल्यावर ‘क्वीक सपोर्ट’या परस्पर मोबाइल हाताळणाऱ्या अ‍ॅपचा वापर करून गुन्हा केला, अशी माहिती पोलिसांना प्राथमिक चौकशीतून उघड झाली आहे.

वांद्रे परिसरात राहणारा व्यावसायिक टीश्यू पेपरचा घाऊक व्यापार करतो. त्याच्या भ्रमणध्वनीवर गुरुवारी दुपारी ‘पेटीएम टीम’ या नावाने लघुसंदेश प्राप्त झाला. त्यात पेटीएम खाते सुरळीत सुरू ठेवण्यासाठी वैयक्तिक तपशिलांची नोंदणी(केवायसी) आवश्यक आहे. नोंदणी न केल्यास खाते २४ तासांच्या आत बंद होईल, असा मजकूर होता. बहुतांश व्यवहार पेटीएमद्वारे करणारा व्यावसायिक या लघुसंदेशामुळे अस्वस्थ झाला. त्याने लघुसंदेशातील क्रमांकावर संपर्क साधला असता समोरून बोलणाऱ्या व्यक्तीने ‘क्वीक सपोर्ट’ नावाचे अ‍ॅप डाऊनलोड करण्यास सांगितले. या अ‍ॅपद्वारे भ्रमणध्वनी, संगणक परस्पर हाताळणे शक्य होते. हे अ‍ॅप घेताच व्यावसायिकाच्या खात्यातून साडेपाच हजार रुपये वळते झाले. हे पैसे पुन्हा खात्यावर येतील. मात्र त्यासाठी डेबिट किंवा क्रेडिट कार्डद्वारे पेटीएम खात्यात दोन रुपये भरा, असे व्यावसायिकाला सांगण्यात आले. तशी कृती करताच एक मिनिटाच्या आत सहा व्यवहारांद्वारे व्यावसायिकाच्या बँक खात्यावरून तीन लाख रुपये वळते झाले. फसवणूक झाल्याचे कळताच व्यावसायिकाने वांद्रे पोलीस ठाण्यात तक्रार दिली.