मुंबई : कामगारांच्या कामाचे तास, बांधकाम कामगारांना न्याय, औद्योगिक सुरक्षेला महत्व देणाऱ्या केंद्र सरकारच्या चार कामगार संहितांअंतर्गत राज्य नियम ३१ ऑक्टोबरपर्यंत प्रसिद्ध केले जाणार आहेत. त्यामुळे राज्यातील अंमलबजावणी प्रक्रियेला वेग आला आहे. सरकारने एप्रिलमध्ये कामगार संहितांशी संबंधित राज्य नियमांचे मसुदे प्रसिद्ध करून कामगार संघटना, कामगार नेते आणि अन्य संबंधित घटकांकडून हरकती व सूचना मागवल्या होत्या. त्यावर ५००हून अधिक हरकती व सूचना आलेल्या होत्या. राज्याच्या विधी विभागाकडून कायदेशीर अभिप्राय पूर्ण झाल्यानंतर या सुधारणा केंद्रीय कामगार मंत्रालयाकडे पाठविल्या जाणार असल्याचे कामगार मंत्री आकाश फुंडकर यांनी सांगितले.

केंद्राकडून त्यावर सूचना अथवा आवश्यक बदल सुचविल्यानंतर मसुदा पुन्हा राज्याच्या कामगार विभागाकडे येईल. त्यानंतर राज्य सरकारकडून अंतिम प्रक्रिया पूर्ण करून नियम अधिवेशनात मांडण्याचा मार्ग खुला होणार आहे, असे फुंडकर यांनी यांनी स्पष्ट केले. राज्याच्या कामगार विभागाने २८ एप्रिल रोजी वेतन संहिता आणि औद्योगिक संबंध संहितेचे मसुदा नियम प्रसिद्ध केले होते. त्यानंतर सामाजिक सुरक्षा तसेच व्यावसायिक सुरक्षा, आरोग्य व कामाच्या परिस्थितीशी संबंधित राज्य नियमांचे मसुदेही प्रसिद्ध करण्यात आले. हरकती व सूचना मागविण्याची प्रक्रिया ४५ दिवसांची ठेवण्यात आली होती. केंद्राच्या चार कामगार संहितांमध्ये वेतन संहिता, औद्योगिक संबंध संहिता, सामाजिक सुरक्षा संहिता आणि व्यावसायिक सुरक्षा, आरोग्य व कामाच्या परिस्थितीची संहिता यांचा समावेश आहे.

या चार संहितांनी केंद्रातील २९ कामगार कायद्यांचे एकत्रीकरण केले आहे. प्रत्येक राज्यातील कामगारांसाठी नियम आणि कायदे वेगळे आहेत. त्यामुळे प्रत्यक्ष अंमलबजावणीसाठी राज्य नियमांची आवश्यकता आहे. त्यामुळे राज्यांचे नियम अंतिम होणे ही संहितांच्या प्रभावी अंमलबजावणीतील महत्त्वाची पायरी मानली जात आहे. केंद्राने सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांनी ३१ ऑक्टोबरपर्यंत कामगार संहितांअंतर्गत राज्य नियम प्रसिद्ध करण्याची अपेक्षा व्यक्त केली आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील हरकती व सूचनांची छाननी, विधी विभागाचा अभिप्राय आणि केंद्राकडे प्रस्ताव पाठविण्याची प्रक्रिया आता वेळेच्या चौकटीत पूर्ण करण्याचे आव्हान कामगार विभागासमोर आहे.

कामगार संघटनांनी नोंदवलेल्या ५००हून अधिक हरकती व सूचनांपैकी कोणत्या सूचना स्वीकारल्या जातात आणि अंतिम नियमांमध्ये त्याचे प्रतिबिंब उमटते, याकडे कामगार क्षेत्राचे लक्ष लागले आहे. राज्याचा कामगार विभाग, विधी विभाग, त्यानंतर केंद्रीय कामगार मंत्रालय आणि पुन्हा राज्य कामगार विभाग, सरतेशेवटी अंतिम नियमांचा निर्णय घेतला जाणार आहे. ३१ ऑक्टोबरची केंद्राची अपेक्षा पूर्ण करण्यासाठी राज्य सरकारची पुढील काही आठवड्यांतील प्रक्रिया निर्णायक ठरणार आहे.