महाराष्ट्र राज्य सरकारने सुरू केलेल्या बहुचर्चित ‘लाडकी बहीण’ योजनेचे समाजात विविध प्रकारे पडसाद उमटले. सरकारी योजनेतील चर्चेचा विषय ठरलेली ही ‘लाडकी बहीण’ आता रुपेरी पडद्यावरही झळकणार आहे. ‘१५०० रुपये हप्ता आमच्या संसारात लाखापेक्षा भारी’ असे म्हणत ‘लाडकी बहीण’ हा आगामी चित्रपट १७ एप्रिल रोजी प्रदर्शित होणार आहे.
शुभम फिल्म प्रोडक्शन प्रस्तुत ‘लाडकी बहीण’ चित्रपटाचे दिग्दर्शन शीतल शिंदे यांचे असून, त्यांनीच शनिदेव फिल्म्सच्या बॅनरखाली निर्मितीही केली आहे. या चित्रपटाची कथा, पटकथा, संवाद गणेश शिंदे यांनी लिहिले आहेत. बाबासाहेब पाटील या चित्रपटाचे कार्यकारी निर्माते आहेत. ‘एकमेकां साह्य करू अवघे धरू सुपंथ…’ या उक्तीचा अवलंब करीत गोरगरीब महिला एकत्र येतात आणि कशा प्रकारे आपला उत्कर्ष साधतात हा एक महत्त्वपूर्ण पैलू ‘लाडकी बहीण’मध्ये आहे. सरकारी कार्यालयांपासून सर्वसामान्यांच्या घरांपर्यंत सर्वत्र चर्चेचा विषय ठरलेला एक महत्त्वपूर्ण विषय हसत-खेळत या चित्रपटात मांडण्यात आला आहे. एक सशक्त संदेश देत हा चित्रपट संपूर्ण कुटुंबाचे परिपूर्ण मनोरंजन करेल, असा विश्वास दिग्दर्शक शीतल शिंदे यांनी व्यक्त केला.
‘लाडकी बहीण’ या चित्रपटात स्मिता तांबे मुख्य भूमिकेत झळकणार असून, तिच्या जोडीला सुरेखा कुडची, उषा नाडकर्णी, उषा नाईक, गौतमी पाटील, रुक्मिणी सुतार, सारिका जाधव, पूनम कापसे, माधव अभ्यंकर, शशांक शेंडे, अनिल नगरकर, सुरेश विश्वकर्मा, सिद्धेश्वर झाडबुके, गणेश शिंदे, दर्शना जोकरे, मेघा शिंदे आदी कलाकार आहेत. चिनू चेतन यांनी नृत्यदिग्दर्शन केले असून, संगीत विनीत देशपांडे यांनी दिले आहे. बाबा लाड, चैतन्य साळुंखे यांनी सिनेमॅटोग्राफी केली असून, गायक-संगीतकार उमेश गवळी तसेच, आनंद शिंदे व गायत्री शेलार यांच्या आवाजात ‘लाडकी बहीण’मधील गाणी संगीतबद्ध करण्यात आली आहेत.
