मुंबई : ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ याेजनेतील पात्र लाभार्थी महिलांना ऑगस्ट महिन्याचा आर्थिक लाभ देण्याकरिता राज्य सरकारने सामाजिक न्याय विभागाचा ३३९ कोटी १४ लाख रुपयांचा निधी वितरित करण्यास मान्यता दिली आहे.
२०२६-२७ या आर्थिक वर्षासाठी ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेच्या अनुसूचित जाती घटकासाठी ३ हजार कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. त्याच तरतुदीतून ऑगस्ट २०२६ महिन्याचा आर्थिक लाभ देण्यासाठी ३३९ कोटी १४ लाख रुपये उपलब्ध करून देण्यात आले आहेत. सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने याबाबत आदेश काढत हा निधी महिला व बालविकास विभागाकडे सुपूर्द केला आहे.
या निधीचे वितरण करताना लाभार्थी महिलांची छाननी करून केवळ पात्र महिलांनाच योजनेचा लाभ मिळत असल्याची खात्री करण्याची जबाबदारी महिला व बालविकास विभागावर सोपविण्यात आली आहे. तसेच अनुसूचित जाती आणि नवबौद्ध प्रवर्गातील लाभार्थी महिलांची संख्या उपलब्ध करून देण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत. या घटकासाठी उपलब्ध करून दिलेल्या निधीचा वापर केवळ अनुसूचित जाती व नवबौद्ध प्रवर्गातील लाभार्थी महिलांसाठीच करण्याची दक्षता घेण्यास विभागाला सांगण्यात आले आहे. यापूर्वीही सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने या योजनेकरिता निधी उपलब्ध करून दिला आहे. वितरित निधीचा काटकसरीने वापर करून मंजूर आराखड्यानुसार चालू आर्थिक वर्षातच खर्च करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
वारंवार निधी वर्ग
‘लाडकी बहीण’ योजनेकरिता २०२५ मध्ये सामाजिक न्याय विभागाच्या निधीतून प्रत्येकी ४१० कोटी ३० लाखांचे दोन हप्ते, म्हणजेच एकूण सुमारे ८२० कोटी ६० लाख वर्ग करण्यात आले होते. वर्ष २०२५-२६ मधील डिसेंबर महिन्याच्या हप्त्यासाठीही पुन्हा ३९३ कोटी २५ लाख मंजूर करण्यात आले. तर जुलै, २०२६चा हप्ता देण्यासाठी विभागाच्या खात्यातून ३१९ कोटी ५३ रूपये निधी वळविण्यात आला. अनुसूचित जाती घटकांसाठी राखीव असलेल्या निधीचा वापर अशा प्रकारे इतर योजनांसाठी वळवला गेल्याने विरोधकांकडून तीव्र आक्षेप घेतला जात आहे.
