मुंबई – मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत ई-केवायसी प्रक्रियेनंतर ८० लाख महिलांचे अर्ज बाद झाल्याची चर्चा दिशाभूल करणारी असून या लाभार्थींची विविध निकषांनुसार पडताळणी सुरू आहे, असे महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी सोमवारी स्पष्ट केले. ई-केवायसी न केलेल्या महिला, उत्पन्न मर्यादा ओलांडणारे लाभार्थी, वयोमर्यादा पूर्ण झालेल्या महिला तसेच अन्य योजनांचा लाभ घेणाऱ्यांचा या आकड्यात समावेश असल्याचे त्यांनी सांगितले.
लाडकी बहीण योजनेअंतर्गत राज्यातील तब्बल ८० लाख महिलांना ई-केवायसी प्रक्रियेनंतर अपात्र करण्यात आल्याचे वृत्त सोमवारी प्रसिद्ध होताच या योजनेवरून विरोधकांनी महायुतीवर टीकेची झोड उठवली. यासंदर्भात पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी वस्तूस्थिती सांगितली. तटकरे म्हणाल्या, की ई-केवायसी प्रक्रिया गेल्या वर्षी ऑगस्टपासून सुरू करण्यात आली होती. मात्र, ई-केवायसी हा निकष केवळ लाडकी बहीण योजनेसाठी नसून राज्यातील सर्व थेट लाभ हस्तांतरण (डीबीटी) योजनांसाठी लागू आहे. त्यामुळे ८० लाखांचा आकडा केवळ ई-केवायसी न केलेल्या महिलांचा नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. फेब्रुवारी आणि मार्च महिन्यांचे अनुदान वितरण सुरू असून सर्व पडताळणी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर अपात्र लाभार्थ्यांची नेमकी संख्या स्पष्ट होईल, असे तटकरे यांनी सांगितले.
राज्याच्या माहिती-तंत्रज्ञान विभागाकडून मागविलेल्या माहितीनुसार सुमारे साडेअकरा ते बारा लाख महिलांचे वार्षिक उत्पन्न अडीच लाख रुपयांपेक्षा अधिक असल्याचे आढळले आहे. तसेच साडेचार ते पाच लाख महिला ६५ वर्षांवरील आहेत. याशिवाय सुमारे साडेचौदा हजार सरकारी कर्मचारी महिलांनीही योजनेचा लाभ घेतल्याचे समोर आले असून त्यांच्याकडून रकमेची वसुली सुरू असल्याचे तटकरे यांनी सांगितले. दरम्यान, संजय गांधी निराधार योजना आणि लाडकी बहीण या दोन्ही योजनांचा लाभ घेणाऱ्या महिलांची नावे छाननीदरम्यान वगळण्यात आली असून त्यांना दोन्हीपैकी एका योजनेचाच लाभ मिळणार आहे. तसेच सुमारे सव्वातीन लाख महिलांच्या नावावर वाहन असल्याची नोंद आढळली आहे. मात्र, वाहन मालकीबाबत काही महिलांनी हरकती नोंदवल्याने त्याचीही फेरतपासणी केली जाणार आहे, असेही मंत्री तटकरे यांनी सांगितले.
पात्र महिला लाभापासून वंचित राहणार नाहीत
काही महिलांनी ई-केवायसी पूर्ण करूनही लाभ बंद झाल्याच्या तक्रारी केल्या आहेत. अशा प्रकरणांची फेरतपासणी करण्यात येत असून तांत्रिक अडचणींमुळे पात्र महिला लाभापासून वंचित राहणार नाहीत, याची काळजी घेतली जाईल, असे आदिती तटकरे यांनी नमूद केले. याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी चर्चा करून पुढील निर्णय घेतले जातील, असेही त्यांनी सांगितले.
ठळक मुद्दे…
- बारा लाख महिलांचे वार्षिक उत्पन्न अडीच लाख रुपयांपेक्षा अधिक
- पाच लाख महिला ६५ वर्षांवरील
- साडेचौदा हजार सरकारी कर्मचारी महिलांनी घेतला योजनेचा लाभ
- संजय गांधी निराधार योजना आणि लाडकी बहीण यापैकी एकाच योजनेचा मिळणार लाभ
- सव्वातीन लाख महिलांच्या नावावर वाहनांची नोंद
