मुंबई: ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने’तील लाभार्थींना जुलै महिन्याचा आर्थिक लाभ देण्यासाठी सामाजिक न्याय विभागाअंर्तगत येणाऱ्या अनुसूचित जाती घटकातील महिलांसाठी राज्य सरकारने महिला विभागाकडे ३१९ कोटी ५३ लाख रुपयांचा निधी वितरित केला आहे. राज्य सरकारची आर्थिक परिस्थिती चांगली नसल्यानेच सामाजिक न्याय विभागाकडून निधी घ्यावा लागतो.

. लाडकी बहीण योजनेच्या पडताळणी नंतर आता एक कोटी ६६ लाख लाडक्या बहीणी पात्र ठरल्या आहेत. २८ ऑगस्ट रोजी रक्षाबंधन आहे. त्यापूर्वी हा निधी वितरीत करण्यासाठी हा निधी वर्ग करण्यात आला आहे. या योजनेतील पात्र लाभार्थींना महिन्याला अडीच हजार कोटी रुपये निधी लागतो.
यंदाच्या आर्थिक वर्षात ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेच्या अनुसूचित जाती घटकासाठी ३ हजार कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. या तरतुदीतून जुलै २०२६ या महिन्याचा आर्थिक लाभ पात्र महिलांना देण्यासाठी ३१९.५३ कोटी रुपयांचा निधी महिला व बाल विकास विभागाच्या सचिवांना अर्थसंकल्पीय निधी वितरण प्रणालीवर वितरित करण्यास शासनाने बुधवारी मान्यता दिली आहे.

अनुसूचित जाती घटकातील पात्र महिलांना योजनेचा लाभ वेळेत मिळावा, या उद्देशाने हा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. निधीचे वितरण आणि खर्च करताना संबंधित नियंत्रक अधिकाऱ्यांनी काटकसरीच्या उपाययोजनांचे पालन करणे आवश्यक आहे. मंजूर आराखड्यानुसार उपलब्ध निधी याच आर्थिक वर्षात खर्च होईल, याची दक्षता घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. निधीचा वापर झाल्यानंतर त्याचा सविस्तर अहवाल सादर करण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत.

लाडकी बहीण योजनेची पडताळणी ३० एप्रिल रोजी पूर्ण झाली आहे. एकूण २ कोटी ४७ लाख अर्जदारांपैकी पडताळणीनंतर १ कोटी ६६ लाख लाडक्या बहीणी पात्र ठरल्या आहेत. सुमारे ८१ लाख लाडक्या बहीणी अपात्र ठरल्या आहेत. येत्या काळात केवळ ६५ वर्षे पूर्ण करणाऱ्या लाडक्या बहीणी अपात्र ठरणार आहेत. ही योजना सुरु झाली तेव्हा रक्षाबंधनाची ओवाळणी म्हणून बहीणींच्या बँक खात्यात थेट तीन महिन्याचे साडेचार हजार रुपये जमा करण्यात आले होते. या ओवाळणीनंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत बहीणींनी राजकीय भावांना भरघोस मतदान केल्याचे दिसून आले.