मुंबई : राज्यातील युवक-युवतींना रोजगाराच्या थेट संधी उपलब्ध करून देण्यासाठी ‘पंडित दीनदयाळ उपाध्याय विश्वविक्रमी रोजगार महाकुंभ महाराष्ट्राचा हा कार्यक्रम कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या संकल्पनेतून आयोजित करण्यात येत आहे. या रोजगार मेळाव्यात लाडक्या बहिणीसाठी महिलांनी उभारलेल्या कंपन्यांमध्ये महिलांच्या माध्यमातून मुलाखत घेऊन त्यांना नोकरी उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
चर्चगेट येथील श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी (एसएनडीटी) महिला विद्यापीठामध्ये होणाऱ्या रोजगार महाकुंभांमध्ये ‘लाडक्या बहिणीं’साठी स्वतंत्र रोजगार मेळावा आयोजित करण्यात आला आहे. त्यात सुमारे ६०० ते ७०० महिला उमेदवार सहभागी होणार आहेत. विविध कंपन्यांच्या स्टॉलवर महिलांना उपलब्ध पदे, आवश्यक पात्रता, कामाचे स्वरूप, वेतनश्रेणी आणि भरती प्रक्रियेची थेट माहिती मिळणार आहे. तसेच लाडक्या बहिणींसाठी महिलांनी उभारलेल्या कंपनीमध्ये नोकरीची संधी उपलब्ध करण्याबरोबरच त्यांची मुलाखत ही महिलांच्या माध्यमातूनच घेण्यात येणार आहे. महिलांच्या कौशल्याला रोजगाराची जोड देऊन त्यांच्या आर्थिक स्वावलंबनाला चालना देणे हा या विशेष मेळाव्याचा उद्देश आहे.
उमेदवारांची शैक्षणिक पात्रता, कौशल्य आणि अनुभव उपलब्ध रिक्त पदांशी जोडण्यासाठी ‘उमेदवार–रिक्त पद जुळवणी’ करण्यात येणार आहे. त्यामुळे युवतींना थेट रोजगार संधींसह उद्योगांच्या मनुष्यबळविषयक गरजा, आवश्यक कौशल्ये आणि विविध क्षेत्रांतील करिअर संधींची माहिती मिळेल. उद्योगांनाही आवश्यक मनुष्यबळ निवडण्याची सुविधा उपलब्ध होईल. उमेदवारांना मुलाखतीसाठी सक्षम करण्याच्या उद्देशाने संवाद कौशल्य, व्यक्तिमत्त्व विकास आणि सॉफ्ट स्किल्सचे प्लेसमेंटपूर्व प्रशिक्षण देण्यात आले आहे.
उमेदवार आणि उद्योजकांची क्यूआर कोडद्वारे नोंदणी
रोजगार महाकुंभात सहभागी होण्यासाठी उमेदवार आणि उद्योजकांना क्यूआर कोडद्वारे नोंदणी करता येईल. अधिक माहिती व मार्गदर्शनासाठी इच्छुकांनी स्थानिक औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आयटीआय) किंवा जिल्हा सहायक आयुक्त, कौशल्य विकास, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मार्गदर्शन केंद्राशी संपर्क साधावा, असे आवाहन विभागाने केले आहे.
कोकण व नाशिक विभागात ४१८ रोजगार मेळावे
कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाच्या या उपक्रमांतर्गत कोकण व नाशिक विभागातील सर्व जिल्ह्यांत ४१२ हून अधिक रोजगार मेळावे आयोजित केले आहेत. या उपक्रमात कोकण विभागातील मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्ग तसेच नाशिक विभागातील नाशिक, अहिल्यानगर, जळगाव, धुळे व नंदुरबार या १२ जिल्ह्यांचा समावेश आहे. या मेळाव्यांमधून स्थानिक स्तरावर २५ हजारांहून अधिक रोजगार संधी उपलब्ध होणार आहेत. या महाकुंभात १ हजार ५०० हून अधिक नामांकित कंपन्या आणि ३ हजारांहून अधिक उद्योग आस्थापना सहभागी होणार आहेत.
