मुंबई : मुंबईसह राज्यात गणेशोत्सव थाटामाटात साजरा केला जात असून सर्वत्र चैत्यन्याचे वातावरण आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही मुंबईतील प्रसिद्ध लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळातील गणेशाच्या दर्शनासाठी गर्दी उसळली असून दानपेटीत पहिल्याच दिवशी कोट्यवधी रुपयांचे दान भाविकांनी अर्पण केले आहे. तसेच अंबानी कुटुंबाकडून साधारण २० किलोचा, १६ कोटी रुपये किंमतीचा मुकुट गणेशाला देण्यात आला आहे.

लालबागच्या दानपेटीत पहिल्या दिवशी गोळा झालेल्या दानाची मोजदाद सुरू आहे. सुरुवातीला पेटीतील रोख, त्यानंतर भक्तांनी अर्पण केलेले सोने आणि चांदीच्या दागिन्यांची मोजदाद केली जाणार आहे. यंदाही पहिल्याच दिवशी लालबाग मंडळाच्या दानपेटीत गणेशभक्तांनी कोट्यवधी रुपयांचे दान दिले आहे. त्यात रोख रुपये, सोन्या – चांदीचे दागिने नाण्यांचाही समावेश आहे. सोन्याच्या मूर्ती, चांदीचे हार, नोटांचे हार अर्पण केले आहेत. दानपेटीत दोन बॅटही आहेत. रोख रक्कमेत परकीय चलनातील काही नोटांचाही समावेश आहे.

हेही वाचा – मुंबई: मुलुंडमध्ये हिट अँड रन, एकाचा मृत्यू

हेही वाचा – प्रधानमंत्री मातृ वंदना योजनेचा दोन वर्षांत आठ लाखांपेक्षा अधिक मातांनी घेतला लाभ!

लालबागच्या राजाच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी लाखो भाविकांसह राजकीय व मनोरंजनसृष्टीतील मंडळीही येत असतात. प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी हे सहकुटुंब दर्शनासाठी येतात. मुकेश अंबानी यांच्या कुटुंबाने लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या विविध उपक्रमांसाठी सहकार्य केले असून कोट्यवधींची देणगीही दिली आहे. त्याचप्रमाणे रिलायन्स फाउंडेशनने यापूर्वी लालबागचा राजा डायलिसिस सेंटरसाठी २४ डायलिसिस यंत्रणा दिल्या आहेत. अंबानी कुटुंबाच्या याच सहकार्याची दखल म्हणून अनंत अंबानी यांची यावर्षी लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या ‘प्रमुख कार्यकारी सल्लागार’ या पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. यंदा अंबानी कुटुंबाकडून लालबागच्या राजाला २० किलो सोन्याचा मुकूट भेट म्हणून देण्यात आला असून या मुकुटाची किंमत जवळपास १६ कोटी रुपये आहे.