मुंबई : शासन निर्णयाच्या चौकटीमुळे गेल्यावर्षी प्रतिष्ठापना होऊ न शकलेला ‘लालबागचा राजा’ यंदा मंडपात विराजमान होणार आहे. विशेष म्हणजे यंदाचा गणेशोत्सव शासन निर्णयानुसार होणार असल्याची घोषणा रविवारी लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने केली.

गेल्यावर्षी करोनामुळे राज्य सरकारने गणेश मूर्तींच्या उंचीवर निर्बंध आणले. मंडळांच्या परंपरागत मूर्तींची उंची मोडून केवळ चार फुटांची गणेश मूर्ती साकारण्याला मंडळांचा विरोध होता. त्यानंतर मंडळाने गणेशोत्सव न करता आरोग्योत्सव करण्याचे ठरवले. परंतु यंदा परंपरा खंडित न करता गणेशोत्सव करणार असल्याचा निर्णय मंडळाने जाहीर केला आहे. शासन निर्णयात असलेले नियम, निकष पाळून गणेशोत्सव साजरा करणार असल्याचे मंडळाने जाहीर के ले आहे.

‘शासनाच्या निर्णयाला आमचा पाठींबा आहे. त्यामुळे शासनाने आखून दिलेल्या नियमानुसार लालबागच्या राजाची मूर्ती घडवली जाईल,’ असे लालबागचा राजा मंडळाचे मानद सचिव सुधीर साळवी यांनी सांगितले.

करोनाची साथ ओसरली नसल्याने यंदाही सरकारने चार फुटांपर्यंतच गणेशमूर्ती साकारण्याचे आदेश मंडळांना दिले. परंतु गतवर्षीपेक्षा यंदाची परिस्थिती नियंत्रणात असल्याने उंचीबाबत शिथिलता आणावी अशी मागणी मंडळे आणि बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीने के ली आहे.

उंचीसाठी समितीचे प्रयत्न

लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने शासन निर्णयाला पाठींबा दिला असला तरी हजारो गणेशोत्सव मंडळे आणि या उत्सवावर पोटपाणी असणारे मूर्तिकार सरकार उंचीच्या मर्यादेत शिथीलता आणेल या आशेवर बसले आहेत. त्यामुळे बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीने अजूनही उंचीसाठी प्रयत्न सुरु ठेवले आहेत. ‘गेला दीड महिना आम्ही मुख्यमंत्र्यांकडे भेटीसाठी वेळ मागत आहोत. उंचीची मर्यादा शिथील करण्यात येईल, अशी अपेक्षा आजही आहे. त्यामुळे केवळ ४० दिवस राहिले असल्याने मुख्यमंत्र्यांनी यावर लवकर विचार करावा,’ असे समितीचे अध्यक्ष नरेश दहीबावकर यांनी सांगितले.