scorecardresearch

नरिमन पॉइंट-कफ परेड पुलाचे काम ‘एल अ‍ॅण्ड टी’कडे? कंपनीची सर्वात कमी रकमेची बोली

एमएमआरडीएने या कामासाठी ३१५ कोटी रुपयांची बोली लावली होती.

नरिमन पॉइंट-कफ परेड पुलाचे काम ‘एल अ‍ॅण्ड टी’कडे? कंपनीची सर्वात कमी रकमेची बोली
नरिमन पॉइंट – कफ परेड या १.६ किमीच्या सागरी पुलाची उभारणी एल अ‍ॅण्ड टी कंपनीकडून होण्याची शक्यता आहे. प्रातिनिधिक फोटो- लोकसत्ता

मुंबई : नरिमन पॉइंट – कफ परेड या १.६ किमीच्या सागरी पुलाची उभारणी एल अ‍ॅण्ड टी कंपनीकडून होण्याची शक्यता आहे. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून एमएमआरडीए) या पुलाच्या बांधकामासाठी मागविण्यात आलेल्या निविदेनुसार एल अ‍ॅण्ड टीची बोली सर्वात कमी आहे.

कफ परेड, चर्चगेट, नेव्ही नगर आणि कुलाबा परिसरात नेहमी वाहतूक कोंडी असते. यामुळे एका सल्लागार कंपनीने २००८-२००९ मध्ये नरिमन पॉईंट ते कफ परेड सागरी मार्गाचा प्रस्ताव ठेवला होता. एमएमआरडीएकडून हा प्रकल्प राबविला जाणार होता. यादरम्यान नरिमन पॉईंटच्या पुनर्विकासाचा प्रकल्प आला. याच कारणाने हा प्रकल्प बासनात गुंडाळला. त्यानंतर हा प्रकल्प रखडला. मात्र आता कोंडीवर उपाययोजना करणे आवश्यक असल्याने एमएमआरडीएने नरिमन पॉईंट ते कफ परेड सागरी पूल प्रकल्प हाती घेतला आहे.

प्रकल्पास नोव्हेंबर २०२१ मध्ये एमएमआरडीएने मान्यता दिली. तर काही महिन्यांपूर्वी प्रकल्पाचा बृहत आराखडा तयार करत बांधकाम करण्यासाठी निविदा मागविण्यात आल्या. या निविदा ४ जानेवारी २०२३ रोजी खुल्या करण्यात आल्या असून एलअँडटी आणि जे कुमार या दोन कंपन्यांनी निविदा सादर केल्या आहेत. यात एलअँडटीची निविदा सर्वात कमी असल्याची माहिती सूत्रांनी दिली. एमएमआरडीएने या कामासाठी ३१५ कोटी रुपयांची बोली लावली होती. त्यानुसार एल अ‍ॅण्ड टीने सर्वात कमी ३१६ कोटी रुपये अशी बोली लावली आहे. त्यामुळे या कंपनीच्या माध्यमातून पुलाचे काम केले जाण्याची शक्यता आहे. मात्र कंत्राट अंतिम झाल्यानंतरच यावर शिक्कामोर्तब होईल.

मराठीतील सर्व मुंबई ( Mumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 15-01-2023 at 03:15 IST

संबंधित बातम्या