अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीसाठी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेच्या गटाची उमेदवारी मिळालेल्या ऋतुजा लटके यांचा राजीनामा तातडीने स्वीकारावा असे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिले आहेत. उद्या सकाळी ११ पर्यंत याबाबतचे पत्र लटके यांना देण्यात यावं असं न्यायालयाने म्हटलं आहे. सुनावणीदरम्यान, उच्च न्यायालयाने पालिकेला खडसावलं असून तुमच्याकडे विशेषाधिकार असताना अशी प्रकरणं आमच्याकडे येता कामा नयेत असं सांगितलं आहे. न्यायालयाच्या या निर्णयावर आता राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया समोर येत आहेत. शिवसेना नेते अनिल परब यांनी या निकालाच्या पार्श्वभूमीवर प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया देताना, शिंदे गट आणि भाजपावर निशाणा साधला.

अनिल परब म्हणाले, “आपणास माहीत आहे की रमेश लटके यांच्या मृत्यूनंतर शिवसेनेने त्यांची पत्नी ऋुतुजा रमेश लटके यांची उमेदवारी जाहीर केली होती. अतिशय साधं हे प्रकरण होतं. परंतु ऋुतुजा लटके यांनी ही निवडणूक लढवू नये. यासाठी शेवटच्या मिनिटापर्यंत प्रयत्न केले गेले. खरंच सगळ्याबाबी अतिशय स्पष्ट होत्या. कायद्यातील तरतुदी सरळ होत्या. त्यांना ज्या तरतुदी लागू पडतात. एक महिनाचा त्यांचा नोटीस किंवा एक महिन्याचा त्यांचा पगार. त्यांच्यावर कुठल्याही प्रकारची चौकशी नाही आणि त्यांची कुठलीही रक्कम देय त्यांना लागत नाही. इतक्या सरळ तरतुदी असताना देखील या गोष्टींसाठी आम्हाला उच्च न्यायालयात जावं लागलं ही दुर्दैवी बाब आहे.”

याशिवाय “एखादी विधावा महिला जेव्हा निवडणुकीला उतरते त्यावेळी खरं म्हणजे तिच्याबाबत सहानुभुतीचं धोरण असलं पाहिजे. परंतु ज्या पद्धतीने अशाप्रकारे आडकाठी केली गेली. म्हणजे अगदी आता दुपारी येऊन महापालिकेच्या वकीलाने असं सांगितलं की, त्यांच्यावर भ्रष्टाचाराची केस आहे. ३ तारखेला त्यांनी राजीनामा दिला आहे आणि आज १२ तारखेला त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले जाताय. म्हणजे किती खालच्या पातळीवर राजकारण चाललं आहे. हे महराष्ट्रातील जनतेने आज बघितलेलं आहे. परंतु न्यायदेवेतेचे आम्ही आभार मानतो आमचा विश्वास होता की न्यायदेवता आम्हाला न्याय देईल. आज न्यायदेवतेने न्याय दिलेला आहे. रमेश लटके यांच्या पत्नी ऋुतुजा रमेश लटके. यांचा उद्या सकाळी ११ वाजेपर्यंत राजीनामा मंजूर केला जाईल. उद्या मोठ्याप्रमाणात कार्यकर्त्यांना घेऊन आम्ही ऋुतूजा लटकेंचा अर्ज भरू.” असंही परब यांनी यावेळी सांगितलं.

तर, “मला असं वाटतं की ज्यावेळेला मी पहिल्या दिवशी बोललो. त्या दिवशी मी अतिशय स्पष्ट सांगिलं की महाराष्ट्रात एक वेगळ्या प्रकारची संस्कृती आहे. आजही महाराष्ट्राचं राजकारण खालच्या स्तराला गेलंय असं मी म्हणणार नाही. पण आता जे काही सुरू आहे ते काही चांगलं चालेलं नाही.” असंही परब म्हणाले.