मुंबई : गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या जयंतीचे औचित्य साधून बुधवारी २८ सप्टेंबरला त्यांचा जीवनपट उलगडणाऱ्या माहितीपटाच्या निर्मितीची घोषणा करण्यात आली. भारतीय संगीत क्षेत्रातील अलौकिक, अद्वितीय सूर म्हणून नावाजलेल्या लतादीदींचा जीवनप्रवास कसा होता हे पाहण्याची संधी चाहत्यांना मिळणार आहे. ‘सम्राज्ञी’ या नावाने येत असलेल्या या माहितीपटाचे दिग्दर्शन संगीतकार मयुरेश पै करणार आहेत. 

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

लतादीदींच्या जन्मदिनाचे औचित्य साधून अनुष्का मोशन पिक्चर्स आणि एन्टरटेन्मेट व लतिका क्रिएशन्स यांनी ‘सम्राज्ञी’ या माहितीपटाच्या निर्मितीची घोषणा केली आहे. ‘लता मंगेशकर या भारतीय संगीताच्या ज्ञानेश्वरी आहेत, या ज्ञानेश्वरीच्या निर्मळ पारायणाचा हा प्रयत्न आहे’, अशा भावनेने ‘सम्राज्ञी’ या माहितीपटाच्या निर्मितीचे धनुष्य ‘एल. एम. म्युझिक’चे मुख्य कार्यकारी अधिकारी मयुरेश पै आणि निर्माते नरेंद्र फिरोदिया यांनी उचलले आहे. ‘लतादीदी या फक्त गायन क्षेत्रात नाही तर प्रत्येक क्षेत्रात होत्या. त्या एक माणूस म्हणून अद्वितीय होत्या,’असे सांगतानाच दीदींशी जोडल्या गेलेल्या काही महत्वाच्या व्यक्तींनी त्यांच्या स्वभावाबद्दल उलगडलेले अनेक किस्से, पैलू या माहितीपटातून पाहता येतील, अशी माहिती पै यांनी दिली. लतादीदी हयात असताना घडलेल्या वादग्रस्त घटनांचाही यात उल्लेख असून त्यांचे ज्ञात नसलेले पैलूही या माहितीपटातून उलगडणार आहेत, असे पै यांनी सांगितले.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Lata mangeshkar life journey documentary september 28 biographies declaration ysh
First published on: 30-09-2022 at 00:02 IST