Omicron Updates : मुंबईत आणखी दोघांना ओमायक्रॉन विषाणूचा संसर्ग, राज्यातील आकडा १० वर

करोनाच्या नव्या ओमायक्रॉन विषाणूचा संसर्ग दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. आज (६ डिसेंबर) मुंबईत नव्याने २ रूग्णांना ओमायक्रॉनचा संसर्ग झाल्याचं समोर आलंय.

Corona Omicrona variant maharashtra covid 19
(प्रातिनिधिक छायाचित्र)

करोनाच्या नव्या ओमायक्रॉन विषाणूचा संसर्ग दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. आज (६ डिसेंबर) मुंबईत नव्याने २ रूग्णांना ओमायक्रॉनचा संसर्ग झाल्याचं समोर आलंय. त्यामुळे आता राज्यातील एकूण ओमायक्रॉन बाधितांची संख्या १० वर पोहचली आहे.

संसर्ग झालेल्यांमध्ये दक्षिण अफ्रिकेतून आलेल्या ३७ वर्षीय प्रवाशाचा समावेश आहे. तो जोहान्सबर्ग येथून २५ नोव्हेंबरला मुंबईत दाखल झाला होता. त्यांचा ओमायक्रॉन संसर्गाच्या चाचणीचा अहवाल पॉझिटीव्ह आला आहे. याशिवाय या रुग्णासोबत राहिलेल्या आणि २५ नोव्हेंबरला अमेरिकेहून आलेल्या त्याच्या मैत्रिणीला देखील ओमायक्रॉन संसर्ग झाल्याचं चाचणी अहवालातून स्पष्ट झालं.

फायझर लसीचे दोन्ही डोस घेऊनही ओमायक्रॉनची बाधा

यो दोन्ही रूग्णांना कोणतीही लक्षणे नाहीत. दोघांनाही मुंबईतील सेव्हन हिल्स रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. विशेष म्हणजे या दोन्ही रूग्णांनी फायझर या करोना विरोधी लसीचे दोन्ही डोस घेतलेले आहेत. त्यानंतरही ओमायक्रॉनचा संसर्ग झाला.

३२० निकटसहवासितांचा शोध घेऊन तपासणी सुरू

मुंबईतील या दोन्ही रूग्णांच्या संपर्कातील ५ अतिजोखमीच्या आणि ३१५ कमी जोखमीच्या निकटसहवासितांचा शोध घेण्यात आला आहे. त्यांची तपासणी सुरू आहे.

राज्यात कुठे किती ओमायक्रॉन विषाणू बाधित रूग्ण?

राज्यातील पहिला ओमायक्रॉन रूग्ण कल्याण डोंबिवलीत आढळला होता. यानंतर पिंपरी चिंचवडमध्ये ६ आणि पुण्यात १ ओमायक्रॉन बाधित रूग्ण आढळले. आता आज मुंबईत २ जणांना ओमायक्रॉन विषाणूचा संसर्ग झाल्याचं स्पष्ट झालं. अशाप्रकारे आतापर्यंत राज्यात एकूण १० जणांना ओमायक्रॉन विषाणूचा संसर्ग झालेला आहे.

हेही वाचा : सावधान, “आगामी काळात आतापेक्षा जीवघेणी साथ येणार”, करोना लस बनवणाऱ्या शास्त्रज्ञाचा ‘हा’ गंभीर इशारा

दरम्यान, कल्याण डोंबिवली महानगरपालिकेला मिळालेल्या २९५ पैकी १०९ जणांशी अद्यापही संपर्क होऊ शकलेला नाही. याबाबत महानगरपालिका आयुक्तांनी स्वतः आज पत्रकार परिषद घेत माहिती दिली.

आयुक्तांनी दिलेल्या माहितीनुसार, “विविध देशातून कल्याण डोंबिवलीमध्ये आलेल्या २९५ नागरिकांची यादी पालिका शासनाला मिळाली आहे. त्यापैकी ८८ नागरिकांची अँटीजन टेस्टिंग करण्यात आली. यापैकी ३४ लोकांचा अहवाल नेगेटिव्ह आले आहेत. उर्वरित ४८ प्रवाशांचे अहवाल येणे बाकी आहे. या यादीतील १०९ जणांशी अद्याप संपर्क होऊ शकलेला नाही. काही प्रवाशांचे फोन स्विच ऑफ आहेत, तर काही प्रवाशांच्या घराला कुलूप आहे. त्यामुळे पालिका वैद्यकीय कर्मचारी त्यांचा शोध घेत आहे.”

“परदेशातून येणाऱ्या नागरिकांसाठी नियमावली तयार करण्यात आली आहे. यानुसार परदेशातून आलेल्या नागरिकांना १४ दिवस गृहविलगीकरण बंधनकारक करण्यात आलंय. ७ दिवसानंतर करोना चाचणी आणि चाचणीनंतर ७ दिवस क्वारंटाईन बंधनकारक करण्यात आले आहे. या नियमांबाबत आदेश काढले असून उद्यापासून कल्याण-डोंबिवली परिसरामध्ये मास्क न लावणाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल. यासाठी पोलिसांबरोबर पालिका संयुक्त कारवाई करेन,” अशी माहिती आयुक्त विजय सूर्यवंश यांनी दिली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मुंबई बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Latest corona omicron infection updates in maharashtra 6 december 2021 pbs

Next Story
परमबीर सिंग प्रकरणी पोलीस महासंचालक संजय पांडेंनी फेटाळले आरोप; म्हणाले, “सिंग यांनीच प्रकरण संपवण्यासाठी…”
फोटो गॅलरी