मुंबई : महायुती सरकारमधील सहकार मंत्री व राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते बाबासाहेब पाटील यांच्यावर रिझर्व्ह बँकेने नियमभंगाची कारवाई करत जिल्हा बँकेच्या संचालकपदावरून बडतर्फ केले आहे. लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालकपदी सलग १० वर्षांपेक्षा जास्त काळ राहिल्याने नियमांचे उल्लंघन झाल्यामुळे त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली.
लातूर बँकेचे सभासद आणि अधिकृत मतदार सतीश शेषराव जाधव यांनी १३ मार्च रोजी लातूरच्या विभागीय सहनिबंधकांकडे तक्रार केली. त्यानंतर २५ मे रोजी रिझर्व्ह बँकेकडे बँकेच्या आठ संचालकांना अपात्र ठरविण्याची मागणी केली होती. त्यानुसार रिझर्व बँक ऑफ इंडियाने शुक्रवारी महाराष्ट्राचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांना बँकच्या संचालकपदावरुन बडतर्फ करण्याचे आदेश दिले आहेत.
रिझर्व्ह बँकेकडे तक्रार करूनही अपेक्षित निर्णय झाला नव्हता. त्यानंतर जाधव यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या छत्रपती संभाजीनगर खंडपीठात याचिका दाखल केली. ७ ऑगस्ट रोजी उच्च न्यायालयाने रिर्झव्ह बँकेला या तक्रारीवर सहा आठवड्यांच्या आत निर्णय घेण्याचे निर्देश दिले होते. न्यायालयाच्या निर्देशानंतर बँकेच्या आठपैकी सात संचालकांनी १० सप्टेबर रोजी पदांचे राजीनामे दिले. मात्र, सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी राजीनामा दिला नव्हता. अखेर मुदत संपण्यापूर्वी रिझर्व्ह बँकेने थेट कारवाईचा बडगा उगारत मंत्री पाटील यांना संचालक पदावरून दूर करण्याचे आदेश दिले.

रिझर्व्ह बँकेच्या या निर्णयावर सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी तीव्र आक्षेप नोंदवला.“२०२१ साली संचालकांना १० वर्षे पदाबाबत जो कायदा संमत करण्यात आला आहे, तो मला लागू होतो. त्यामुळे मी बडतर्फ होऊ शकत नाही. आरबीआयचा निर्णय अयोग्य असून मी बँकेचा संचालक म्हणून या निर्णयाला उच्च न्यायालयात आव्हान देणार आहे, अशी प्रतिक्रिया मंत्री पाटील यांनी व्यक्त केली. बँकिंग कायदा (सुधारणा) अधिनियम, २०२५ मधील तरतुदींनुसार सहकारी बँकेच्या संचालकपदाच्या सलग कार्यकाळावर १० वर्षांची मर्यादा लागू करण्यात आली आहे.
आरबीआयच्या २०२६ मधील ग्रामीण सहकारी बँकांच्या प्रशासनासंबंधी सुधारित निर्देशांमध्येही सलग १० वर्षांचा कार्यकाळ पूर्ण केलेल्या संचालकासाठी त्याच बँकेत पुन्हा संचालक होण्यापूर्वी तीन वर्षांचा ‘कूलिंग-ऑफ’ कालावधी ठेवण्यात आला आहे. तक्रारदार सतीश जाधव यांनी याच आधारावर आठ संचालकांच्या अपात्रतेची मागणी केली होती. तसेच बँकेतील कथित बेकायदेशीर नोकरभरती रद्द करून प्रशासक नियुक्त करण्याची मागणीही केली होती.
