मुंबई : भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने (एनएचएआय) लातूर शहरातील अंतर्गत वाहतूक कोंडीचा प्रश्न सोडविण्यासाठी लातूर रिंग रोड बांधण्याचा निर्णय घेतला आहे. सुमारे ६० किमी लांबीच्या रिंग रोडचा सविस्तर आराखडा तयार करण्यासाठी सल्लागाराची नियुक्ती करण्यासाठी एनएचएआयने निविदा मागविल्या होत्या. आर्थिक निविदा नुकत्याच खुल्या करण्यात आल्या असून या निविदेत ग्लोबल इन्फ्रा सोल्यूशन्स कंपनीने बाजी मारली. या कंपनीच्या निविदेला अंतिम मान्यता घेऊन शक्य तितक्या लवकर आराखड्याच्या कामाला सुरुवात करण्याचे एनएचएआयचे नियोजन आहे.

मराठवाड्यातील लातूर शहरात आजघडीला अंतर्गत वाहतूक कोंडीचा प्रश्न गंभीर बनला आहे. लातूर शहरातून इतर जिल्ह्यांत, गावांमध्ये जाणाऱ्या अवजड, प्रवासी वाहनांची संख्याही वाढली आहे. त्यामुळे लातूर शहरातील अंतर्गत रस्त्यांवर वाहतूक कोंडीचा प्रश्न गंभीर बनला आहे. अपघातांची भीती वाढली आहे. या पार्श्वभूमीवर लातूरमधील रहिवाशांकडून रिंग रोडची मागणी करण्यात येत होती. ही मागणी लक्षात घेत ‘एनएचएआय’ने ६० किमी लांबीचा लातूर रिंग रोड बांधण्याचा निर्णय घेतला. या रिंग रोडचा सविस्तर आराखडा तयार करण्यासाठी सल्लागाराची नियुक्ती करण्याकरिता काही दिवसांपूर्वी एनएचएआयने निविदा मागविल्या होत्या. जुलैमध्ये तांत्रिक निविदा खुल्या करण्यात आल्या आणि या निविदेला चांगला प्रतिसाद मिळाला. अल्मंडझ ग्लोबल इन्फ्रा कन्सल्टंट लिमिटेड आणि ग्लोबल इन्फ्रा सोल्यूशन्स या दोन कंपन्यांच्या निविदांचा त्यात समावेश होता. प्राप्त निविदांची छाननी करून एनएचएआयने नुकत्याच आर्थिक निविदा खुल्या केल्या. यात ग्लोबल इन्फ्रा सोल्यूशन्स कंपनीने बाजी मारली.

ग्लोबल इन्फ्रा सोल्युशन्सच्या निविदेला आता अंतिम मान्यता घेतली जाईल. त्यानंतर सल्लागार म्हणून या कंपनीची नियुक्ती करून आराखड्याच्या कामाला सुरुवात केली जाणार आहे. निविदेनुसार या कंपनीकडून २७० दिवसांत अर्थात ९ महिन्यांत आराखड्याचे काम पूर्ण करून घेतले जाणार आहे. आराखडा पूर्ण झाल्यानंतर त्याला मान्यता घेऊन पुढील प्रक्रिया पूर्ण करून या कामासाठी निविदा प्रक्रिया राबविली जाणार आहे. दरम्यान, लातूर रिंग रोड औसा रोड, चांडेश्वर, कव्हा, बाभळगाव, नांदेड रोड आणि अंबेजोगाई रोड या परिसरांना जोडणार आहे. हा रस्ता नेमका कसा असेल, कुठून सुरू होईल आणि कुठे संपेल, या प्रकल्पासाठी किती खर्च येईल, या सर्व बाबी आराखडा अंतिम झाल्यानंतर स्पष्ट होतील. मात्र, हा प्रकल्प पूर्ण होऊन रिंग रोड वाहतूक सेवेत दाखल झाल्यास लातुरकरांना मोठा दिलासा मिळणार आहे. या रिंग रोडमुळे लातूर शहरातील अवजड वाहनांची, प्रवासी वाहनांची संख्या कमी होईल आणि शहरातील अंतर्गत वाहतूक कोंडी दूर होईल. त्यामुळे हा प्रकल्प लातूरवासीयांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे.