मुंबई : लातूर शहरातील अंतर्गत वाहतूक कोंडीचा प्रश्न सोडविण्यासाठी भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने (एनएचएआय) लातूर रिंग रोड बांधण्याचा निर्णय घेतला आहे. अंदाजे ६० किमी लांबीच्या रिंग रोडचा सविस्तर आराखडा तयार करण्यासाठी सल्लागाराची नियुक्ती केली जाणार आहे. सल्लागाराच्या नियुक्तीसाठी ‘एनएचएआय’ने निविदा मागविल्या होत्या. नुकत्याच तांत्रिक निविदा खुल्या करण्यात आल्या असून दोन कंपन्यांनी निविदा सादर केल्या आहेत. आता या निविदांची छाननी करून निविदा अंतिम केल्या जातील आणि त्यानंतर आराखड्याच्या कामाला सुरुवात केली जाणार आहे.

मागील काही वर्षांपासून लातूर शहरातील वाहनांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. लातूर शहरातून इतर जिल्ह्यांत, गावांमध्ये जाणाऱ्या अवजड, प्रवासी वाहनांची संख्याही वाढली आहे. त्यामुळे लातूर शहरातील अंतर्गत रस्त्यांवर वाहतूक कोंडीचा प्रश्न गंभीर बनला आहे. अपघातांची भीती वाढली आहे. या पार्श्वभूमीवर लातूरमधील रहिवाशांकडून रिंग रोडची मागणी करण्यात येत होती. ही मागणी लक्षात घेत ‘एनएचएआय’ने ६० किमी लांबीचा लातूर रिंग रोड बांधण्याचा निर्णय घेतला.

हा रिंग रोड औसा रोड, चांडेश्वर, कव्हा, बाभळगाव, नांदेड रोड आणि अंबेजोगाई रोड या परिसरांना जोडणार आहे. हा रस्ता नेमका कसा असेल, कुठून सुरू होईल आणि कुठे संपेल, या प्रकल्पासाठी किती खर्च येईल याबाबतचा सविस्तर अभ्यास करण्यासाठी सल्लागाराची नियुक्ती करण्यासाठी ‘एनएचएआय’ने काही दिवसांपूर्वी निविदा मागविल्या होत्या. नुकत्याच तांत्रिक निविदा खुल्या करण्यात आल्या असून दोन कंपन्यांनी निविदेला प्रतिसाद दिल्याची माहिती ‘एनएचएआय’चे प्रादेशिक व्यवस्थापक अंशुमाली श्रीवास्तव यांनी ‘लोकसत्ता’ला दिली.

अल्मंडझ ग्लोबल इन्फ्रा कन्सल्टंट लिमिटेड आणि ग्लोबल इन्फ्रा सोल्यूशन या दोन कंपन्यांच्या निविदांचा त्यात समावेश आहे. या निविदांची छाननी करण्यात येणार आहे. त्यानंतर आर्थिक निविदा खुल्या करून ३१ ऑगस्टपर्यंत निविदा अंतिम केल्या जातील, असेही अंशुमाली श्रीवास्तव यांनी सांगितले.

सल्लागाराची नियुक्ती केल्यानंतर आराखड्याच्या कामाला सुरुवात केली जाणार आहे. आराखडा तयार करून बांधकामाची निविदा प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर रिंग रोडच्या प्रत्यक्ष कामाला सुरुवात करण्याचे ‘एनएचएआय’चे नियोजन आहे. हा रिंग रोड बांधून पूर्ण होऊन सेवेत दाखल झाल्यास लातूर शहरातील अवजड वाहनांची, प्रवासी वाहनांची संख्या कमी होईल आणि शहरातील अंतर्गत वाहतूक कोंडी दूर होईल. त्यामुळे हा प्रकल्प लातूरवासीयांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे.