मुंबई : प्रत्येक आव्हानाला धीटाईने सामोरे जात आपापल्या क्षेत्रात जिद्द आणि नवनिर्मितीच्या जोरावर नवे मापदंड निर्माण करणाऱ्या तरुणांच्या पाठीवर कौतुकाची थाप देणारा ‘लोकसत्ता तरुण तेजांकित पुरस्कार’ सोहळा नुकताच संपन्न झाला. विज्ञान- तंत्रज्ञान, कला- मनोरंजन, नवउद्योग, सामाजिक, प्रशासकीय अशा विविध क्षेत्रात भरीव काम करणाऱ्या १६ तरुण तेजांकितांचा सन्मान सोहळा शनिवारी, ९ एप्रिल रोजी सायंकाळी ४ वाजता ‘एबीपी माझा’वर प्रसारित करण्यात येणार आहे.
करोनाचे निर्बंध आणि भय कमी झाल्यानंतर देखण्या आयोजनात आणि उत्साहात पार पडलेल्या ‘लोकसत्ता तरुण तेजांकित पुरस्कार’ सोहळय़ात केंद्रीय मंत्री धर्मेद्र प्रधान यांच्या हस्ते १६ प्रज्ञावंतांचा सन्मान करण्यात आला. विज्ञान-तंत्रज्ञानाची कास धरत सर्वसामान्यांसाठी कार्य करणारे, मनोरंजन-क्रीडा किंवा प्रशासकीय सेवेत राहून जनमानसासाठी कार्यरत असलेले, संशोधक म्हणून लौकिक मिळवण्यापासून शेतकऱ्यांना लाभ मिळवून देणाऱ्या अशा नानाविध प्रकारे कर्तृत्व उभारणाऱ्या या तरुणाईची कथा प्रेरणादायी अशीच आहे. या तरुणाईची जिद्द, त्यांचा संघर्ष आणि त्यासाठी त्यांना मिळालेला सन्मानाचा आनंदक्षण अनुभवण्याची संधी आज ‘एबीपी माझा’वरील या सोहळयाच्या प्रसारणामुळे मिळणार आहे. पुरस्कारांच्या जोडीला अभिनेत्री गिरीजा ओक – गोडबोले यांचे खुसखुशीत सूत्रसंचलन, अभिनेता पुष्कर श्रोत्रीचे निवेदन आणि सत्यजित प्रभू, अमर ओक, महेश खानोलकर, नीेलेश परब, दत्ता तावडे आणि आर्चिस लेले यांनी विविध वाद्यांवर वाजवलेल्या गाण्यांमधून ‘द म्युझिशियन्स’ या बॅण्डने रंगवलेली सूरमैफल असा हा अनोखा सोहळा शनिवारी पाहता येईल. या कार्यक्रमाचे पुन:प्रसारण रविवारी, १० एप्रिलला दुपारी २ वाजता करण्यात येणार आहे.
- मुख्य प्रायोजक : महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (एमआयडीसी)
- सहप्रायोजक : सारस्वत को-ऑपरेटिव्ह बँक लि., वल्र्ड वेब सोल्युशन्स, सिडको, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ , झी मराठी
- पॉवर्ड बाय : पर्यटन संचालनालय, महाराष्ट्र, महाराष्ट्र नॉलेज कॉर्पोरेशन लि.
- नॉलेज पार्टनर : प्राइस वॉटरहाउस कूपर्स
- टेलिव्हिजन पार्टनर : एबीपी माझा