मुंबई: लोककलेचा नृत्य प्रकार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लावणी नृत्याला अश्लीलतेचे वळण लागल्याने आता सेन्साँर बोर्डाचा अंकुश लावण्यात आला आहे. त्यामुळे अश्लील डीजे लावणी आणि आक्षेपार्ह कार्यक्रमांना आळा घालण्यासाठी तमाशा, लावणी आदी कार्यक्रमांच्या सादरीकरणासाठी राज्याच्या सेन्साँर बोर्डाकडून योग्यता प्रमाणपत्र घ्यावे लागणार आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या(अजित पवार गट) चित्रपट साहित्य, कला व सांस्कृतिक विभागाचे अध्यक्ष बाबासाहेब पाटील यांनी राज्याच्या सांस्कृतिक विभागाकडे तक्रार केली होती. महाराष्ट्रातील लावणी, लोककला, आणि सांस्कृतिक कार्यक्रमाच्या नावखाली अश्लील डीजे लावणी व आक्षेपार्ह कार्यक्रमांना आळा घालण्याची मागणी यामध्ये केली होती. अशा कार्यक्रमांवर नियंत्रण ठेवण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा, नियम व योग्य प्रमाणपत्राची आवश्यक्ता असल्याचे नमूद केले होते. या मागणीची सांस्कृतिक कार्य विभाग व रंगभूमी प्रयोग परिनिरक्षण विभागाने निर्देश जारी केले आहेत
या संदर्भात राज्याच्या रंगभूमी प्रयोग परिरक्षण मंडळाचे सचिव सं. पु. खामकर यांनी राज्याचे पोलिस महासंचालक, पोलिस आयुक्त व सर्व जिल्हा पोलिस निरिक्षकांना पत्र पाठवले आहे.
लावणीत पारंपारिक वाद्यांचा वापर
सार्वजनिक मनोरंजनाच्या ठिकाणी लोककलेचा भाग असलेला लावणी कार्यक्रम करायचा असल्यास संबंधितांनी त्या लावणी कार्यक्रमाची संहिता, निवेदन, सारांश हा रंगभूमी मंडळ कार्यालयाकडे पूर्वनिरिक्षणासाठी सादर करून योग्यता प्रमाणपत्र घेणे नियमानुसार बंधनकारक केले आहे. लावणी कार्यक्रमात पारंपारिक वाद्याचा वापर करून कला सादर करणे अपेक्षित आहे.
या कार्यक्रमांसाठी योग्यता प्रमाणपत्राची गरज
त्यामुळे शासनाच्या निर्देशानुसार सार्वजनिक ठिकाणी सादर होणारे मनोरंजानाचे नाटक, एकांकिका, लोकनाट्य, तमाशा, लावणी, लोकसंगीत, वग, मेळे या कार्यक्रमांच्या संहितेस निवेदनास रंगभूमी परिनिरिक्षण मंडळाचे योग्यता प्रमाणपत्र(स्टँबिलिटी सर्टिफिकेट ) असल्याची खातरजमा करूनच अशा कार्यक्रमांना परवानगी देण्याचा निर्णय घेण्याबाबत आपल्या विभागातील अधिकारी कर्मचारी यांना आपल्या स्तरावरून सूचना जारी कराव्यात असे रंगभूमी प्रयोग परिनिरिक्षण मंडळाच्यावतीने पोलिस महासंचालकांना पाठवलेल्या पत्रात नमूद केले आहे
.
अश्लिलता असल्यास कारवाई
अशा कार्यक्रमांमध्ये प्रमाणित केलेल्यासंहिता, निवेदन, सारांश, या व्यतिरिक्त अश्लिल भाग निदर्शनास आल्यास किंवा तक्रारी आल्यास आपल्या स्तरावरून सबंधितांवर कार्यवाही करावी असे पत्रात नमूद केले आहे.
