मुंबई : राज्यातील पाच वर्षांच्या विधि (एलएलबी) अभ्यासक्रमाची केंद्रीय प्रवेश प्रक्रिया बुधवारी सुरू झाली असून, महाविद्यालयांचा पसंतीक्रम भरण्यासाठी विद्यार्थ्यांकडे शुक्रवारपर्यंतचा वेळ आहे. इच्छुक विद्यार्थ्यांना ७ ऑगस्टपर्यंत पर्याय भरता येणार आहे. त्यानंतर १२ ऑगस्ट रोजी पहिल्या फेरीतील जागावाटपाची यादी जाहीर होणार आहे.

राज्याच्या सीईटी कक्षामार्फत शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी पाच वर्षांच्या विधि अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया राबवण्यात येत आहे. अंतिम गुणवत्ता यादी जाहीर झाल्यानंतर आता विद्यार्थ्यांना महाविद्यालयांचा पसंतीक्रम भरण्याची संधी दिली आहे. त्यामुळे पसंतीक्रम भरताना महाविद्यालयांचे प्राधान्य, स्थान, शुल्क आणि उपलब्ध जागा यांचा विचार करून काळजीपूर्वक पर्याय निश्चित करण्याचे आवाहन सीईटी कक्षाने केले आहे.पहिल्या फेरीचे जागावाटप १२ ऑगस्ट रोजी जाहीर होणार असून, या फेरीमध्ये प्रवेशाची संधी मिळालेल्या विद्यार्थ्यांना १५ ऑगस्ट वगळून १३ ते १८ ऑगस्टदरम्यान संबंधित महाविद्यालयात प्रत्यक्ष उपस्थित राहून कागदपत्र पडताळणी आणि प्रवेश निश्चित करावा लागणार आहे. त्यानंतर १९ ऑगस्ट रोजी महाविद्यालयांकडून प्रवेशित विद्यार्थ्यांची माहिती पोर्टलवर जाहीर करण्यात येईल.

१८ हजार ३०५ विद्यार्थ्यांनी नोंदणी

यंदा पाच वर्षांच्या विधि अभ्यासक्रमासाठी एकूण १८ हजार ३०५ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. यंदा सीईटी कक्षाने सीईटी परीक्षा दिलेल्या, पण प्रवेशासाठी नोंदणी न केलेल्या विद्यार्थ्यांनाही दिलासा दिला आहे. अशा विद्यार्थ्यांना तिसरी फेरी आणि संस्थास्तरीय फेरीसाठी ५ ते ३१ ऑगस्टदरम्यान नव्याने नोंदणी करता येणार असल्याची माहिती सीईटी कक्षाने दिली.