मुंबई : मुंबई विद्यापीठाच्या विधि अभ्यासक्रमाच्या उत्तरपत्रिका न तपासताच अनेक प्रश्नांना ‘एनए’ म्हणजेच सदर प्रश्न सोडवलेलाच नाही, असा शेरा देऊन विद्यार्थ्यांना अनुत्तीर्ण करण्यात आले आहे. उत्तरपत्रिकांची छायांकित प्रत मागविल्यानंतर हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला.

सततच्या चुकांनंतर मुंबई विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यमापन मंडळाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून विद्यार्थी संघटनांनी टीकेची झोड उठविली आहे. मुंबई विद्यापीठाने तीन वर्षीय विधि अभ्यासक्रम सहावे सत्र आणि पाच वर्षीय विधि अभ्यासक्रमाच्या दहाव्या सत्राची १६ ते ३० एप्रिल या कालावधीत परीक्षा घेतली. निकाल ९ जून रोजी जाहीर झाला. ‘करविषयक कायदा’ आणि ‘भारतीय साक्ष अधिनियम’ या विषयांत काही विद्यार्थी अनुत्तीर्ण दाखविण्यात आले. या विद्यार्थ्यांनी उत्तरपत्रिकांच्या छायांकित प्रतींसाठी (फोटोकॉपी) अर्ज केला. त्यानंतर उत्तरपत्रिकांची तपासणीच करण्यात आली नसून उत्तरे लिहूनही शेवटी अनेक प्रश्नांना ‘एनए’ शेरा दिल्याचे समोर आले आहे. एका विद्यार्थिनीला ‘भारतीय साक्ष अधिनियम’ या (पान ९ वर) (पान १ वरून) विषयात ६० पैकी ३३ गुण मिळाले आहेत. मात्र सदर विद्यार्थिनीचा १४ गुणांचा प्रश्नच तपासण्यात न आल्याचे स्पष्ट झाले आहे. या कारभारामुळे विद्यार्थ्यांना नाहक मनस्ताप सहन करावा लागत आहे. उत्तरपत्रिकांचे लवकरात लवकर पुनर्मूल्यांकन करावे आणि विद्यार्थ्यांसाठी अनुकूल शैक्षणिक वातावरण निर्माण करावे, अशी अपेक्षा ‘करविषयक कायदा’ विषयाच्या विद्यार्थ्याने व्यक्त केली. विद्यापीठाच्या पुनर्मूल्यांकन प्रक्रियेबद्दल चिंता असून निकालासाठी दीर्घकाळ वाट पहावी लागते. त्यामुळे पुढील शिक्षणासाठी अडचणींचा सामना करावा लागतो, असे ‘भारतीय साक्ष अधिनियम’ विषयाच्या विद्यार्थिनीने म्हटले आहे. हा प्रकार गंभीर असून विद्यार्थ्यांच्या भविष्याशी आणि करिअरशी खेळणे संपूर्णत: चुकीचे असल्याचे विद्यार्थी चळवळीतील कार्यकर्ते अॅड. सचिन पवार म्हणाले. या प्रकरणाची तातडीने चौकशी करून विद्यार्थ्यांना लवकरात लवकर न्याय मिळवून द्यावा. अन्यथा तीव्र भूमिका घेतली जाईल, असा इशाराही त्यांनी दिला.

विद्यार्थ्यांच्या प्रमुख मागण्या

– ‘करविषयक कायदा’ आणि ‘भारतीय साक्ष अधिनियम’ या विषयांच्या उत्तरपत्रिकांचे पुनर्मूल्यांकन करावे.

– शैक्षणिक प्रगतीमध्ये विलंब टाळण्यासाठी पुनर्मूल्यांकनाचा निकाल लवकर जाहीर करावा.

– विद्यार्थ्यांच्या कामगिरीबद्दल पारदर्शक आणि तपशीलवार अभिप्राय द्यावा.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

विद्यापीठाचे म्हणणे काय?

विधि अभ्यासक्रमाच्या घडलेल्या प्रकाराबद्दल सखोल चौकशी करण्यात येईल. यासाठी नियमानुसार चौकशी समिती स्थापन करण्यात येईल आणि चौकशीअंती दोषी प्राध्यापकांवर कारवाई करण्यात येईल. उत्तरपत्रिकांच्या तपासणीबाबत नियमांची प्राध्यापकांना सविस्तर माहिती देऊन मार्गदर्शन करण्यात येईल, असे मुंबई विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यमापन मंडळाच्या संचालक डॉ. पूजा रौंदळे यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना सांगितले.