मुंबईच्या वाकोला परिसरात शुक्रवारी झालेल्या इमारत दुर्घटनेत या इमारतीमध्ये राहणा-या श्रीधरन कुटुंबीयांपैकी सुधा श्रीधरन यांना आपला जीव गमवावा लागला होता. तर, सत्यम श्रीधर हेसुद्धा या दुर्घटनेत जखमी झाले आहेत. मात्र, यासाठी पालिकेकडून इमारत खाली करण्यासाठी वारंवार सांगूनसुद्धा फ्लॅट खाली न करण्याचा हट्टीपणा श्रीधरन कुटुंबीयांना नडला असल्याचे स्पष्ट होत आहे. पालिकेकडून ही इमारत धोकादायक म्हणून जाहीर करण्यात आल्यानंतर २००७ सालापासून पालिकेकडून श्रीधरन कुटुंबीयांना वारंवार इमारतीमधील फ्लॅट खाली करण्यासाठी सांगण्यात येत होते.  या इमारतीमध्ये राहणा-या अन्य २४ कुटुंबांनी यापूर्वीच पालिकेच्या सांगण्यानुसार इमारत खाली केली होती. मात्र, उच्च न्यायालयात वकीली करणा-या संध्या श्रीधरन आणि त्यांच्या कुटुंबीयांनी ईमारतीमधून बाहेर करण्यास नकार दर्शविला होता. संध्या श्रीधर आपल्या बहीण आणि भावासह ३० वर्षांपासून या इमारतीच्या तळमजल्यावर राहत होत्या. शुक्रवारी संध्या श्रीधरन या कामानिमित्त बाहेर गेल्या असताना ही दुर्घटना घडल्याने त्या बचावल्या. तसेच इमारत पडताना त्यांचा भाऊ सत्यम घरातून बाहेर पडण्यात यशस्वी ठरला. मात्र, सुधा श्रीधरन यांना घरातून बाहेर न पडता आल्यामुळे त्यांचा मृत्यू झाला. संध्या श्रीधरन यांच्या हट्टीपणामुळे शेजारच्या चाळीतील कुटुंबीयांनासुद्धा आपला जीव नाहक गमवावा लागला असल्याचे या चाळीत राहणा-या नॅन्सी डिसिल्वा यांनी सांगितले आहे.