मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भूमिका मुस्लीमधार्जिणी आणि जातीय ध्रुवीकरणाची असल्याचा आरोप विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. मतांचे धार्मिक व जातीय आधारावर ध्रुवीकरण करण्यासाठी पवार यांनी मुस्लीम धर्मीयांचे लांगूलचालन केल्याचे पवार यांच्या विविध मुद्दय़ांवरील वक्तव्यांचा १४ ट्वीटमध्ये संदर्भ देत फडणवीस यांनी निदर्शनास आणून दिले आहे.

 राज्यघटनाकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संकल्पनेतील भारतात पवार यांची भूमिका व वर्तन स्वीकारार्ह नाही, असे फडणवीस यांनी डॉ. आंबेडकर यांच्या जयंतीचे औचित्य साधून समाजमाध्यमांवर स्पष्ट केले आहे. जम्मू व काश्मीरला स्वतंत्र दर्जा देणारे ३७० कलम राज्यघटनेत समाविष्ट करण्यास डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा विरोध होता, याचा संदर्भ फडणवीस यांनी घटनाकार डॉ. आंबेडकर यांच्या जयंतीचे औचित्य साधून दिला आहे. हे कलम रद्द करण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयास पवार यांनी कडाडून विरोध केला होता.

 ‘काश्मीर फाइल्स’ चित्रपटात हिंदू पंडितांच्या वेदना मांडल्या असतानाही पवार यांनी घेतलेल्या भूमिकेवरुनही फडणवीस यांनी टीका केली आहे.  नवाब मलिक हे मुस्लीम असल्याने त्यांचे दाऊद इब्राहिमशी आर्थिक हितसंबंध असल्याच्या आरोपासाठी अंमलबजावणी संचालनालयाने अटक केल्याचे वक्तव्य पवार यांनी केले होते. अतिरेकी कारवायांचा आरोप असलेली इशरत जहाँ २०१३ मध्ये पोलीस चकमकीत ठार झाल्यावर ती निर्दोष होती, असे पवार यांनी म्हटले होते आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी तिला मदतही केली होती. तेव्हा ते सत्तेत होते. आझाद मैदानात २०१२ मध्ये हिंसाचार झाल्यावर रझा अकादमीवर योग्य कारवाई केली गेली नाही, असे फडणवीस यांनी म्हटले आहे. राज्यघटनेत धर्माच्या आधारावर आरक्षण देण्याची तरतूद नसतानाही पवार यांनी मुस्लीम आरक्षणासाठी पुढाकार घेतला. अल्पसंख्याक समाज कोणाचाही पराभव करू शकतो, असे वक्तव्य पवार यांनी केले होते.  हिंदू दहशतवादी असा शब्दप्रयोग सर्वात आधी पवार यांनी वापरला होता. सच्चर समितीचा अहवाल लागू करण्याची मागणीही केली होती. १९९३ च्या मुंबईतील बॉम्बस्फोटांच्या वेळी १३ वा बॉम्बस्फोट मुस्लीम वस्तीत झाल्याचे खोटेच सांगितले होते, याचे स्मरण फडणवीस यांनी करून दिले आहे.