मुंबई : ‘‘राजकीय नेते जेवढे प्रगल्भ असतील तेवढेच चांगले निर्णय होतील. नेत्यांनी जनतेमध्ये राहिलेच पाहिजे कारण जनतेच्याच माध्यमातून सर्व गोष्टी कळत असतात. पण त्याच वेळी सामाजिक-आर्थिक परिवर्तन घडवायचे असेल तर त्यासाठी नेत्यांना स्वत:ची मते, अभ्यास आणि व्यासंग असायला हवा,’’ असे मत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी ‘सिटिझनविल’ या पुस्तकाच्या प्रकाशन समारंभात व्यक्त केले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अमेरिकेतील कॅलिफोर्निया राज्याचे राज्यपाल गॅविन न्युसम यांनी सॅनफ्रान्सिस्कोचे महापौर असताना शहराच्या विकासासाठी राबविलेल्या उपक्रमांबाबत लिहिलेले ‘सिटिझनविल’ या पुस्तकाचा मराठी अनुवाद काँग्रेसचे युवा नेते सत्यजीत तांबे यांनी केला आहे. फडणवीस, काँग्रेसचे विधिमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात, नॅशनल स्टॉक एक्स्चेंजचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशीष चौहान, क्रिकेटपटू अजिंक्य रहाणे, वक्ते गौर गोपाल दास, काँग्रेसच्या आमदार यशोमती ठाकूर, भाजपचे आमदार प्रवीण दरेकर, अमेय प्रकाशनचे उल्हास लाटकर यांच्या उपस्थितीत या पुस्तकाचे प्रकाशन बुधवारी झाले.

 या वेळी फडणवीस म्हणाले, एका मोठय़ा संघटनेची जबाबदारी पेलताना सत्यजीतने आपला व्यासंग, अभ्यास कायम ठेवला. त्याचे वेगळेपण आपल्याला पुस्तकाच्या अनुवादातही दिसते. जे चांगले आहे ते लोकांपर्यंत पोहोचले पाहिजे. ‘‘नवे काही करण्यासाठी सत्यजीत प्रयत्नशील असतो. नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून आपले प्रश्न कसे सोडविता येतील याचा तो नेहमी विचार करतो,’’ असे मत थोरात यांनी व्यक्त केले. हे पुस्तक सर्व भारतीयांनी वाचले पाहिजे. अनेक नव्या, चांगल्या योजनांची ओळख या पुस्तकातून होते, असे चौहान यांनी सांगितले.

‘‘शहरांचा विकास हा आता फक्त पायाभूत सुविधांपुरता मर्यादित राहिलेला विषय नाही आहे. उद्योगक्षेत्र, रोजगारनिर्मिती, गुन्हेगारी नियंत्रण, सामाजिक न्याय या सर्वाशी त्याचा संबंध आहे. राजकीय नेते, प्रशासन, सामान्य जनता यांच्यात चांगला संवाद झाला तर निश्चितच देश महासत्ता होईल,’’ असे मत तांबे यांनी व्यक्त केले.

सत्यजीत तांबे यांनी मराठी

भाषेत अनुवाद केलेल्या ‘सिटिझनविल’ या पुस्तकाची निर्मिती ही पुण्याच्या अमेय प्रकाशन यांनी केली आहे. पुस्तकाचे मुखपृष्ठ नीलेश जाधव यांनी रेखाटले आहे. शहर विकासासाठी तंत्रज्ञानाचा वापर व लोकसहभाग, डिजिटल माध्यमांचा वापर या विषयांवर ‘सिटझनविल’ हे पुस्तक आधारित आहे.

आम्ही चांगली माणसे जमा करतो..

फडणवीस यांनी या प्रकाशन सोहळय़ादरम्यान सत्यजीत तांबे यांचे भरभरून कौतुक केले. या वेळी मंचावर उपस्थित बाळासाहेब थोरात यांना उद्देशून देवेंद्र फडणवीस म्हणाले, ‘‘बाळासाहेब, माझी एक तक्रार आहे, सत्यजीतसारखे नेते तुम्ही किती दिवस बाहेर ठेवणार आहात? जास्त दिवस बाहेर ठेवू नका, नाहीतर आमचाही डोळा त्यांच्यावर जातो. कारण चांगली माणसे जमाच करायची असतात.’’ फडणवीस यांच्या या वक्तव्यावर उपस्थितांसह थोरात यांनाही हसू आवरता आले नाही.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Leaders own opinion perspective devendra fadnavis political leaders in the public mumbai news ysh
First published on: 08-12-2022 at 00:56 IST