लोकसत्ता प्रतिनिधी

मुंबई : महानगरपालिका प्रशासनाच्या महत्वाकांक्षी अशा सागरी किनारा रस्ता प्रकल्पातील बोगद्यांत पाणी झिरपत असल्याचे दिसून आले. अवाढव्य खर्च करून साकारलेल्या सागरी किनारा रस्ता प्रकल्पातील बोगद्याला गळती लागल्यामुळे पालिकेवर टीकेची झोड उठली. दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंगळवारी घटनास्थळी पाहणी करून यंत्रणांना तात्काळ दुरुस्तीच्या सूचना दिल्या. तसेच, दुरुस्ती कामादरम्यान वाहतुकीला अडथळा निर्माण होणार नसल्याचेही शिंदे यांनी माध्यमांशी बोलताना स्पष्ट केले.

महापालिकेने मोठ्या थाटामाटात सागरी किनारा रस्ता प्रकल्पातील एक बाजू ११ मार्च रोजी खुली केली. लवकरच त्याची दक्षिण मार्गिका सुरु करण्यात येणार आहे. चौदा हजार कोटी रुपये खर्च करून पालिकेने हा प्रकल्प सुरु केला आहे. मात्र, पावसाळा सुरु होण्यासाठी काही आठवडे शिल्लक असतानाच बोगद्यांना गळती लागल्याने प्रकल्पातील कामाच्या दर्जाबाबत प्रश्न उपस्थित करण्यात येत आहेत. तसेच, या मार्गावरील सुरक्षेबाबतही चर्चांना उधाण आले आहे. सोमवारी सायंकाळी बोगद्यांच्या छतावरून पाणी ठिबकत असल्याचे दिसून आले. बोगद्यात ठिकठिकाणी भिंतीवरून पाणी झिरपत होते. बोगद्याच्या सांध्यांमधूनही गळती होत असून भिंतींमध्ये ओलसरपणा पसरला होता. गळती होत असल्याचे समोर येताच पालिका अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन बोगद्याची पाहणी केली. तसेच, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही पाहणी करून दुरुस्ती प्रक्रियेबाबत अधिकाऱ्यांकडून माहिती घेतली. यावेळी टनेल एक्सपर्ट जॉन यांचीही मुख्यमंत्र्यांनी भेट घेतली. बोगद्यातील गळती थांबवण्यासाठी तात्काळ दुरुस्तीकाम हाती घेण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांना दिले.

आणखी वाचा-मुंबई : पन्नाशी ओलांडलेल्या महिलांचे दहावीच्या परीक्षेत घवघवीत यश

ही गळती थांबवण्यासाठी विशिष्ट तंत्रज्ञान वापरण्यात येणार आहे. तसेच, त्यासाठी पॉलिमर ग्राऊटींगच्या इंजेक्शनचाही वापर केला जाणार आहे. केवळ तात्पुरता उपाय नव्हे, तर गळतीच्या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढला जाणार आहे. गळतीमुळे बोगद्याच्या मुख्य रचनेला कुठलीही बाधा निर्माण झालेली नाही. त्यामुळे दुरुस्तीकाम लवकरच पूर्ण होईल. तसेच, या दुरुस्तीदरम्यान वाहतूक सुरळीत राहील, अशी माहिती शिंदे यांनी दिली. बोगद्याच्या दोन्ही बाजूला मिळून एकूण ५० जॉइंट्स आहेत. दरम्यान, केवळ गळती लागलेल्या सांध्यांची दुरुस्ती न करता सर्वच सांध्यांमध्ये गळती होणार नाही, यादृष्टीने उपाययोजना करण्याचेही आदेश त्यांनी अधिकाऱ्यांना दिले.

काही दिवसांपूर्वी समुद्रातील भरतीच्या वेळी हाजीअली येथील अंडरपासमध्ये पाणी साचले होते. तसेच, सागरी किनारा रस्ता मार्गावर भेगा पडल्याचेही फोटो समाजमाध्यमांवर फिरत होते. यावेळीही पालिकेच्या नियोजनावर मुंबईकरांनी संतप्त प्रतिक्रिया दिल्या होत्या. वारंवार निर्माण होत असलेल्या समस्यांमुळे आणि आता बोगद्यातील गळतीमुळे विरोधकांकडूनही पालिकेवर चौफेर टीका करण्यात येत आहेत.