रात्रीच्या अंधारात सोडियम व्हेपर दिव्यांच्या प्रकाशात झगमगणारी मुंबई आता अधिकच लखलखणार आहे. मुंबईच्या रस्त्यांवर वीजपुरवठा करणाऱ्या ‘बेस्ट’ उपक्रमाने महापालिकेकडे एक प्रस्ताव दिला आहे. या प्रस्तावात मुंबईच्या रस्त्यांवर एलईडी दिवे बसवण्याची मागणी असून हा प्रस्ताव अंतिम टप्प्यात असल्याची माहिती बेस्टचे महाव्यवस्थापक ओमप्रकाश गुप्ता यांनी दिली. त्यामुळे येत्या दोन वर्षांत मुंबईतील सर्वच रस्त्यांवर या एलईडी दिव्यांची रोषणाई होणार आहे. विशेष म्हणजे या दिव्यांमुळे ४० टक्के ऊर्जेची बचत होणार आहे.
बेस्ट समितीच्या गुरुवारी झालेल्या सभेत सोडियम व्हेपरचे दिवे खरेदी करण्याबाबतचा प्रस्ताव मांडला गेला. या वेळी समिती सदस्य प्रमोद मांद्रेकर व केंदार होंबाळकर यांनी सोडियम व्हेपरऐवजी एलईडी दिव्यांची खरेदी का करण्यात येत नाही, असा प्रश्न उपस्थित केला. प्रस्तावाला मान्यता मिळाल्यानंतर याबाबतच्या निविदा काढण्यात येतील. त्यानंतर प्रभागनिहाय हे एलईडी सोडियम वेपर दिव्यांची जागा घेतील.
या सर्व प्रक्रियेला दीड ते दोन वर्षे लागतील. या प्रस्तावाला मान्यता मिळणे सुलभ व्हावे, यासाठी बेस्टने आपल्या एका आगारात सोडियम वेपरचे दिवे बसवले आहेत. या दिव्यांमुळे होणारी ऊर्जेची बचत, त्यासाठी येणारा खर्च या सर्वाचा तपशील पालिकेपुढे ठेवण्यात येणार असल्याचे
गुप्ता म्हणाले.
एलईडीचे गुणगान!
सोडियम व्हेपरच्या तुलनेत एलईडी दिवे विकत घेण्यासाठी तीन ते चारपट जास्त खर्च येतो. मात्र या दिव्यांचे आयुर्मान जास्त असते. सोडियम व्हेपरचे दिवे वर्षभरासाठी चालतात, तर एलईडी दिव्यांची हमी पाच ते सात वर्षे आहे. त्याचप्रमाणे सोडियम व्हेपरच्या दिव्याचे देयक १०० रुपये येत असेल, तर एलईडी दिव्याचे देयक ६० रुपये येते. परिणामी ४० टक्के बचत होणार आहे. मुंबईच्या रस्त्यांवर बेस्टच्या अखत्यारीत असलेल्या दिव्यांची संख्या ५२ हजार
एवढी आहे.
प्रस्ताव कुठपर्यंत?
हे दिवे ‘बांधा-वापरा-हस्तांतरित करा’ या तत्त्वावर उभारायचे झाल्यास बेस्टने आपल्या शिलकीतून हा खर्च उचलायचा आणि महापालिकेकडून सोडियम व्हेपरच्या दिव्यांच्या रकमेइतकेच देयक घेऊन फायद्यातून कंत्राटदाराचे देयक चुकते करायचे किंवा महापालिकेने सर्व खर्च उचलायचा असे दोन पर्याय आहेत.
*दोन वर्षांत महानगरात एलईडी दिव्याचे खांब
*‘बेस्ट’चा प्रस्ताव महापालिकेच्या विचाराधीन
*४० टक्के ऊर्जा व पैशांची बचत होणार