मुंबई : एचडीएफसी बँक विरुद्ध लीलावती ट्रस्ट वादाला आणखी एक वळण मिळाले आहे. लीलावती कीर्तिलाल मेहता मेडिकल ट्रस्टने (एलकेएमएम ट्रस्ट) एचडीएफसी बँकेचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी शशिधर जगदीशन यांच्याविरुद्ध आक्षेपार्ह विधान केल्याप्रकरणी एक हजार कोटी रुपयांचा मानहानीचा दिवाणी दावा दाखल केला आहे.
लीलावती ट्रस्टचे कायमस्वरूपी विश्वस्त प्रशांत मेहता यांच्याबाबत जगदीशन यांनी आक्षेपार्ह खोटे आणि बदनामीकारक विधाने केल्याचा दावा करून ट्रस्टने हा दिवाणी दावा दाखल केला आहे. याशिवाय, गिरगाव दंडाधिकारी न्यायालयात फौजदारी तक्रार देखील दाखल केली आहे. याबाबत ट्रस्टने निवेदन प्रसिद्ध केले.
लीलावती कीर्तिलाल मेहता मेडिकल ट्रस्टच्या देखरेखीखाली लीलावती रुग्णालय चालवण्यात येते. तथापि, जगदीशन यांनी ट्रस्टची प्रतिष्ठा मलीन करण्यासाठी आणि ट्रस्टच्या कामकाजात अडथळा आणण्यासाठी मोहीम राबवल्याचा ट्रस्टचा आरोप आहे.
दरम्यान, गिरगाव न्यायालयाने जगदीशन, त्यांचे प्रवक्ते आणि कॉर्पोरेट कम्युनिकेशन प्रमुख यांना नोटीस बजावली आहे. जगदीशन यांच्याविरोधात फौजदारी तक्रार किंवा दिवाणी दावा सूडबुद्धीने दाखल केलेला नाही. तर कोणत्याही आधाराशिवाय बँकेकडून धर्मादाय संस्था आणि तिच्या संस्थापक कुटुंबाला बदनाम करण्याच्या सततच्या प्रयत्नांना दिलेला प्रतिसाद आहे, असे ट्रस्टने म्हटले आहे.
दरम्यान, दोन कोटी रुपयांहून अधिकची लाच मागितल्याप्रकरणी प्रशांत मेहता यांच्या तक्रारीवरून दाखल केलेला गुन्हा रद्द करा या मागणीसाठी जगदीशन यांनी दोन दिवसांपूर्वीच उच्च न्यायालयात धाव घेतली होती. तसेच, कठोर कारवाईपासून संरक्षण देण्याची मागणी केली होती. चेतन मेहता ग्रुपला लीलावती किर्तीलाल मेहता मेडिकल ट्रस्टवर बेकायदेशीररित्या नियंत्रण ठेवू देण्यास मदत करण्यासाठी २.०५ कोटी रुपयांची लाच घेतल्याचा आरोप प्रशांत मेहता यांनी जगदीशन यांच्यावर केला होता फौजदारी तक्रार नोंदवताना केला होता.
तर, विश्वस्तांकडून पैसे मिळाल्याचा आरोप हास्यास्पद असल्याचा दावा जगदीशन यांच्यातर्फे उच्च न्यायालयात करण्यात आला होता. एचडीएफसी बँकेने मेहता यांच्या नियंणाखालील स्प्लेंडर जेम्स कंपनीकडून ६५.२२ कोटी रुपयांच्या कर्जाची वसुली प्रक्रिया सुरू केल्यानंतरच मेहता यांनी आपल्यावर सूड उगवण्यासाठी पोलीस तक्रार केल्याचा दावाही जगदीशन यांच्यातर्फे करण्यात आला. आपल्यावर सूड उगवण्यासाठी मेहता यांच्याकडून लीलावती ट्रस्टचा आधार घेतला जात असल्याचा दावा जगदीशन यांनी केला होता.