सीएए, एनआरसी, एनपीआरसह केंद्र सरकारविरोधात डाव्या संघटना एकवटल्या

शरद पवारांच्या नेतृत्वात २४ जानेवारीला मुंबईत विशाल रॅलीचे आयोजन

संग्रहीत

नागरिकत्व दुरुस्ती कायदा (सीएए), एनआरसी (राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी सूची) आणि एनपीआरबाबत (राष्ट्रीय लोकसंख्या नोंदणी सूची) यांच्यासह केंद्र सरकारविरोधात राज्यातील महाविकासआघाडीच्या सरकारमधील घटक पक्षांसह सर्व डावे पुरोगामी पक्ष व संघटना एकवटल्या आहेत.

या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांच्या नेतृत्वात २४ जानेवारी रोजी दुपारी दादर येथील हुतात्मा बाबू गेनू कामगार मैदानावर विशाल रॅली आयोजित करण्यात आली आहे. यासाठी सर्व पक्षीय राष्ट्रीय नेत्यांना देखील बोलावण्यात येणार आहे.

मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष एकनाथ गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या काँग्रेस, राष्ट्रवादी, समाजवादी पार्टी, लोक भारती, सीपीआय, सीपीएम, जनता दल सेक्युलर, बीआरएसपी, राष्ट्र सेवा दल, भटके विमुक्त समाज, कामगार संघटना आणि विद्यार्थी संघटना यांच्या प्रतिनिधींच्या आज मुंबईत झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. बैठकीचे निमंत्रक आमदार कपिल पाटील आणि आमदार किरण पावसकर यांनी याबाबत माहिती दिली आहे.

या नव्या कायद्याने आदिवासी, भटके विमुक्त, लिंगायत आणि मुस्लीम यांच्यासह धर्म नसलेलेही बाधित होणार आहेत. देशातील ३० टक्क्यांहून अधिक समाजाला नोटबंदी पेक्षा अधिक मोठ्या जाचाला सामोरं जावं लागणार आहे. हा प्रश्न कोणत्या जाती समुहांचा नसून भारतीय नागरिकत्वाचा आणि संविधानाच्या रक्षणाचा मुद्दा आहे. त्यामुळे सर्व भारतीयांनी एकजुटीने केंद्र सरकारच्या विरोधात लढाईला सज्ज व्हावे, असे आवाहन आजच्या बैठकीत करण्यात आले असल्याचे सांगण्यात आले आहे. याचबरोबर कोणत्याही पक्षाचा झेंडा न वापरता देशाचा तिरंगा हातात घेऊन ‘हम भारत के लोग’ या नावानेच हे आंदोलन सुरू ठेवण्यास राजकीय पक्षांनी संमती दिली. राष्ट्र सेवा दलाचे अध्यक्ष डॉ. गणेश देवी यांच्या पुढाकाराने अलीकडेच देशभरातील विचारवंत व अ‍ॅक्टिव्हीस्ट एकत्र आले होते. त्यावेळी ‘हम भारत के लोग’ या नावाने हे आंदोलन पुढे नेण्याचा निर्णय झाला होता, अशी देखील माहिती देण्यात आली आहे.

बैठकीस लोक भारतीचे आमदार कपिल पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे आमदार किरण पावसकर, काँग्रेस पार्टीचे एकनाथ गायकवाड व सचिन सावंत, समाजवादी पार्टीचे मिराज सिद्दीकी, सीपीआयचे प्रकाश रेड्डी, राष्ट्र सेवा दलाचे विश्वस्त व अंजुमने इस्लामचे चेअरमन डॉ. जहीर काझी, बीआरएसपीचे सुरेश माने, सीपीएमचे डॉ. अशोक ढवळे, जनता दल सेक्युलरचे प्रभाकर नारकर, मलविंदसिंग खुराणा, सीटीझन्स फोरम अगेंस्ट एनआपली/ एनपीआर चे फारूक शेख, भटके विमुक्त समाजाचे नेते डॉ. कैलास गौड, छात्र भारतीचे सचिन बनसोडे आदींची उपस्थिी होती.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मुंबई बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Left organizations united against the central government including caa nrc npr msr

ताज्या बातम्या