scorecardresearch

बेपत्ता कर्मचाऱ्यांच्या वारसांना अनुकंपा तत्त्वावर नोकरीची संधी ; प्रचलित धोरणात  बदल

अनुकंपा धोरणानुसार  अशा बेपत्ता कर्मचाऱ्यांच्या वारसाला नोकरीत घेण्याबाबत  नेमका कोणता निर्णय घ्यावा याविषयी नियमामध्ये कोणतीही सुस्पष्टता नव्हती.

बेपत्ता कर्मचाऱ्यांच्या वारसांना अनुकंपा तत्त्वावर नोकरीची संधी ; प्रचलित धोरणात  बदल
प्रातिनिधिक फोटो

सिद्धेश्वर डुकरे, लोकसत्ता 

मुंबई: शासकीय नोकरीत कर्तव्यावर असताना बेपत्ता असलेल्या कर्मचाऱ्यांच्या वारसाला अनुकंपा तत्त्वावरील नोकरीची संधी मिळणार आहे. तसेच नोकरीसाठी गट डमधून गट क वर्गात प्रतीक्षा सूचीमध्ये नाव समाविष्ट करण्याची संधीही उपलब्ध झाली आहे. दुसरीकडे सरकारी सेवेत अनुकंपा तत्त्वावरील उमेदवारांची प्रतीक्षा यादी ११ हजारांवर गेल्याने या यादीतील उमेदवारांना लवकर नोकरीची संधी मिळावी, अशी मागणी करण्यात येत आहे. 

सरकारी सेवेत कर्तव्य बजावताना मृत्यू  ओढवल्यास संबंधित कर्मचाऱ्यांच्या कुटुंबातील एका सदस्याला अनुकंपा तत्त्वावर शासकीय सेवेत सामावून घेतले जाते.  शासकीय नोकरीत असताना बेपत्ता झालेल्या  कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांना किमान तीन वर्षे ते कमाल सात वर्षे नोकरीसाठी प्रतीक्षा करावी लागते.  अनुकंपा धोरणानुसार  अशा बेपत्ता कर्मचाऱ्यांच्या वारसाला नोकरीत घेण्याबाबत  नेमका कोणता निर्णय घ्यावा याविषयी नियमामध्ये कोणतीही सुस्पष्टता नव्हती. सरकारी धोरणात बदल करण्याची मागणी करण्यात येत होती. यानुसार  प्रचलित अनुकंपा तत्त्वावरील भरती धोरणात बदल केले आहेत. यामुळे बेपत्ता असलेल्या शासकीय कर्मचाऱ्यांस सक्षम न्यायालयाने मृत म्हणून घोषित केल्यानंतर त्याच्या कुटुंबातील पात्र सदस्यांपैकी एकाची अनुकंपा तत्त्वावर नियुक्ती होऊ शकते. हा संबंधित कुटुंबाला फार मोठा दिलासा मिळाला आहे.

अनुकंपा तत्त्वावर वर्ग डह्ण आणि वर्ग कह्ण यामध्ये नोकऱ्या दिल्या जातात. यामध्ये  शिपाई, वाहनचालक, माळी, लिपिक, टंकलेखक आदी नोकऱ्यांचा समावेश आहे.  प्रतीक्षायादीत डह्ण गटासाठी (श्रेणी ४) नाव   उमेदवारांचे नाव समाविष्ट  केले आहे. मात्र त्यानंतर उमेदवाराने कह्ण गटाच्या नोकरीसाठी शैक्षणिक पात्रता संपादन केलेली असेल तर त्याला नोकरीसाठी गट बदलता येत नव्हता. मात्र  यापुढे जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत नोकरीचा गट बदलता येतो. यामुळे वरच्या गटातील नोकरीची संधी मिळणार आहे.

११ हजार उमेदवारांची प्रतीक्षा यादी : राज्यात विविध विभागात ‘क’ व ‘ड’ गटाची मिळून ११ हजार जणांची प्रतीक्षा यादी आहे. प्रत्येक विभागाचे मंजूर पदांचे प्रमाण हे वेगवेगळे आहे. सार्वजनिक बांधकाम विभाग, कृषी, वन व सामाजिक वनीकरण, आदी विभागात हे प्रमाण  जास्त आहे. त्या त्या विभागाचे कार्यालयप्रमुख  अनुकंपा तत्त्वावरील पदे भरत असतात. सध्या अनुकंपा धोरणानुसार एकूण पदाच्या ६० टक्के इतकी पदे भरली नाहीत. या भरतीसाठी ४५ वर्षे ही वयाची अट आहे. तर कह्ण गट भरतीसाठी पदवीधर ही शैक्षणिक अट आहे. मात्र विविध विभागात मागील पाच वर्षांपासून भरती झालेली नाही.

अनुकंपा तत्त्वानुसार भरतीत बेपत्ता कर्मचाऱ्यांबाबत धोरणात  सुधारणा करण्यात आली ही आनंदाची बाब आहे. मात्र अनेक विभागात अनुकंपा तत्त्वावरील  भरती झालेली नाही. अनेक उमेदवारांना संधी मिळत नाही. वय उलटून गेल्यामुळे त्यांना कायमचे सरकारी नोकरीपासून वंचित राहावे लागत आहे. सरकारने अशाही उमेदावारांना नोकरीची संधी द्यावी.

–  भाऊसाहेब पठाण, महाराष्ट्र राज्य चतुर्थ  श्रेणी कर्मचारी महासंघ अध्यक्ष

मराठीतील सर्व मुंबई ( Mumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

संबंधित बातम्या