मुंबई : मतांची फाटाफूट होण्याची भीती तसेच मोठ्या प्रमाणावर पैशांचा खेळ होण्याची शक्यता हे लक्षात घेता विधान परिषदेच्या ११ जागांसाठी होणारी निवडणूक बिनविरोध करण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरू झाले आहेत. महाविकास आघाडीकडून दुसऱ्या जागेसाठी शेकापचे जयंत पाटील यांना पाठिंबा दिला जाणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

विधान परिषदेच्या ११ जागांसाठी होणाऱ्या निवडणुकीत भाजप, शिंदे गट आणि अजित पवार गट महायुतीचे ९ उमेदवार तर महाविकास आघाडीचे दोन उमेदवार संख्याबळानुसार निवडून येऊ शकतात. महाविकास आघाडीने तिसरा उमेदवार रिंगणात उतरविल्यास प्रत्यक्ष निवडणूक होण्याची शक्यता आहे. महाविकास आघाडीकडून तिसऱ्या उमेदवाराबाबत चाचपणी करण्यात आल्याचे समजते. पण तिसऱ्या उमेदवाराला उभे केल्यास सारी ताकद पणाला लावावी लागेल.

महाविकास आघाडीने दोनच उमेदवार उभे केल्यास ही निवडणूक बिनविरोध होईल. एका जागेवर काँग्रेसचा उमेदवार निवडून येईल. राष्ट्रवादी शरद पवार गट आणि शिवसेना ठाकरे गटाच्या अतिरिक्त मतांच्या आधारे दुसरा उमेदवार निवडून येण्याएवढे आमदारांचे संख्याबळ आहे. दुसऱ्या जागेसाठी शेकापचे विद्यामान आमदार जयंत पाटील यांना पाठिंबा देण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सांगितले.

हेही वाचा >>>बीबीए, बीसीए अभ्यासक्रमाची पुनर्परीक्षा होणार ? सीईटी कक्षाकडून सरकारकडे विचारणा

शिंदेंची तारेवरची कसरत

भाजपचे पाच, शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाचे प्रत्येकी दोन उमेदवार निवडून येऊ शकतात. शिंदे गटात उमेदवारीवरून प्रचंड मारामारी आहे. प्रत्येकाला आमदारकी हवी आहे. लोकसभेला पक्षाने उमेदवारी नाकरलेल्या माजी खासदारांनीही आमदारकीवर दावा केला आहे. सर्वांची समजूत काढताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना तारेवरची कसरत करावी लागेल.

भाजपकडून नवे चेहरे

अजित पवार गटात अनेक इच्छुक असले तरी पक्षाने दोन उमेदवार आधीच निश्चित केले आहेत. भाजपकडून नव्या चेहऱ्यांना संधी दिली जाणार आहे. मुदत संपत असली तरी राष्ट्रीय समाज पक्षाचे आमदार महादेव जानकर यांना पुन्हा उमेदवारी मिळण्याबाबत साशंकता व्यक्त केली जात आहे. कारण लोकसभा निवडणुकीत जानकर यांना परभणी मतदारसंघातून महायुतीने उमेदवारी दिली होती, पण त्यात त्यांचा पराभव झाला. जानकर यांनी विधानसभा लढवावी, असाही प्रस्ताव आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Legislative council election jayant patil is nominated from mahavikas aghadi amy