अंधेरीतील शाळेत बिबटय़ा!

अंधेरी पूर्व येथील शेर-ए-पंजाब वसाहतीतील रहिवाशांना रविवारी बिबटय़ाचा थरार अनुभवण्यास मिळाला.

Leopard in school, children play school in andheri,
अंधेरी पूर्व येथील शेर-ए-पंजाब वसाहतीतील रहिवाशांनी रविवारी बिबटय़ाचा थरार अनुभवला. शाळेत शिरलेल्या या बिबटय़ाला सायंकाळी सातच्या सुमारास जेरबंद करण्यात आले.

दिवसभराच्या कारवाईनंतर बिबटय़ाला जेरबंद करण्यात यश

अंधेरी पूर्व येथील शेर-ए-पंजाब वसाहतीतील रहिवाशांना रविवारी बिबटय़ाचा थरार अनुभवण्यास मिळाला. शेर-ए-पंजाब वसाहतीमधील लहान मुलांच्या शाळेत रविवारी सकाळी शिरलेल्या मादी बिबटय़ाला दिवसभरानंतर अखेर जेरबंद करण्यात आले. सायंकाळी सातच्या सुमारास ठाणे वन विभाग आणि संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या बचाव पथकाने ही कारवाई केली. भर वस्तीत बिबटय़ा शिरल्याने बघ्यांनी मोठी गर्दी केली होती.

मुंबईतील संजय गांधी राष्ट्रीय उद्यान आणि आरे वसाहतीत अनेक बिबटय़ांचा मुक्त वावर आहे. दोन आठवडय़ांपूर्वी गोरेगाव येथील बिंबिसारनगर आणि ठाण्यातील उपवन विभागात बिबटय़ा फिरत असल्याचे तेथील रहिवाशांनी पाहिले होते. रविवारी सकाळी सात वाजण्याच्या सुमारास प्रभातफेरीसाठी बाहेर पडलेल्या नागरिकांनी शेर-ए-पंजाब  गुरुद्वाराच्या भिंतीवर बिबटय़ाला पाहिले. त्यानंतर हा बिबटय़ा तेथूनच जवळ असलेल्या ‘ज्युनियर क्राफ्टिंग’ या लहान मुलांच्या शाळेत शिरला. नागरिकांनी तातडीने वनविभाग, पोलीस आणि अग्निशमन दलाला याची माहिती दिली. संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या बचाव पथकातील विशेष अधिकारी चाळीसगाव येथे नरभक्षक बिबटय़ाला पकडण्यासाठी गेले होते. वनविभागाकडून आदेश मिळताच हे पथक तातडीने मुंबईकडे यायला निघाले. पथकाने शाळेत शिरलेल्या बिबटय़ाला बेशुद्धीचे इंजेक्शन देऊन पकडले. या बिबटय़ाला संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात आणले असल्याची माहिती संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचे वनाधिकारी आणि बिबटय़ा बचाव पथकाचे प्रमुख शैलेश देवरे यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना दिली.

बघ्यांची गर्दी..

शाळेतील खोलीत असलेल्या ‘सीसीटीव्ही’ चित्रणाद्वारे बिबटय़ा खोलीमध्येच वावरत असल्याची माहिती मिळाल्याचे मुंबईचे मानद वन्यजीव रक्षक सुनिज कुंजु यांनी सांगितले. शाळेच्या मागील बाजूस असणाऱ्या दरवाजावरून उडी मारून बिबटय़ाने शाळेमध्ये प्रवेश केल्याची माहिती त्यांनी दिली. भर वस्तीत बिबटय़ा अडकला असल्याने बघ्यांची गर्दी टाळण्यासाठी आणि बिबटय़ा खोलीबाहेर पडू नये म्हणून खोलीला जाळीने संरक्षित केल्याचे ठाणे वनविभागाचे उप-वनसंरक्षक जितेंद्र रामगावकर यांनी सांगितले.

नरभक्षक बिबटय़ा ठार

जळगाव : खानदेशातील चाळीसगावसह मालेगाव तालुक्यात सात जणांचा बळी आणि २० पेक्षा अधिक जनावरांचा फडशा पाडणाऱ्या बिबटय़ाला अखेर ठार करण्यात आले आहे. वन विभागाने दिसता क्षणी ठार करण्याचे आदेश दिल्यानंतर शनिवारी रात्री हैदराबाद येथून आलेल्या नेमबाजाने बिबटय़ाला ठार केले.

चाळीसगाव तालुक्यात जुलैपासून बिबटय़ाचे सतत हल्ले सुरू होते. या हल्ल्यात चार महिला, तीन मुले आणि २० पेक्षा अधिक जनावरांचे बळी गेले. चाळीसगाव तालुक्यातील वरखेडे, उंबरखेड, देशमुखवाडी परिसरांत बिबटय़ाचा वावर होता. बिबटय़ाची दहशत आणि नागरिकांमधील संताप यामुळे नरभक्षक बिबटय़ाला दिसता क्षणी ठार करण्याचे आदेश वनविभागाने दिले. बिबटय़ाला शोधण्यासाठी ‘ट्रॅप’ कॅमेरे लावण्यात आले. ‘ड्रोन’च्या साहाय्यानेही त्याचा शोध सुरू होता. पिंजरे लावूनही बिबटय़ा त्यात अडकत नव्हता. त्यानंतर हैदराबादहून आलेले नेमबाज नवाब खान यांनी शनिवारी चाळीसगाव तालुक्यातील पिंपळवाड (म्हाळसा) ते वरखेडे खुर्द मार्गावर बिबटय़ाचा शोध सुरू केला. रात्री १० च्या सुमारास बिबटय़ा नजरेस पडताच नवाब खान यांनी गोळीबार करून बिबटय़ाला ठार केले.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Leopard enters children play school in andheri

ताज्या बातम्या