दूषित पाण्यामुळे होत असलेल्या लेप्टो या आजारामुळे ४१ वर्षीय रुग्णाचा मृत्यू झाला. लेप्टोमुळे झालेला हा या वर्षांतील पहिलाच मृत्यू असून गेल्यावर्षीच्या तुलनेत या वेळी लेप्टो रुग्णांची संख्या कमी असल्याचा दावा पालिकेने केला आहे.
एका खासगी कंपनीत काम करत असलेल्या या रुग्णाने आठवडाभर खासगी रुग्णालयात उपचार घेतले. मात्र उपचार लागू पडत नसल्याने त्याला शनिवारी महापालिकेच्या भाभा रुग्णालयात दाखल करण्यात आले. या रुग्णाला कावीळही झाली होती तसेच त्याला कृत्रिम श्वसनयंत्रणेवर ठेवण्यात आले होते. मात्र त्याचा मृत्यू झाला.
जून २०१३ मध्ये पालिकेच्या रुग्णालयात २१ रुग्णांनी उपचार घेतले, यावर्षी केवळ दोन रुग्ण होते. जुलै २०१३ मध्ये २४ तर यावर्षी आतापर्यंत चार लेप्टो रुग्ण पालिकेकडे उपचारांसाठी आले.
शरीरावरील उघडय़ा जखमांशी दूषित पाण्याचा संपर्क आला असता हा आजार होतो. त्यामुळे साठलेल्या पाण्यातून आल्यानंतर या जखमांचे तातडीने निर्जंतुकीकरण करणे आवश्यक ठरते, असे पालिकेच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले.